होळी विशेष ,बारवाडीची सोमजाई ....

होळी (शिमगा) विशेष लेख


Mumbai:-

कोण म्हणतं आजची तरुणाई ही बेधुंद झाली आहे, कोण म्हणतं आजच्या तरुणाई ला गांभीर्य राहिलेले नाही ,असं म्हंटलं जाते की आजच्या तरुणाईला सणांचे महत्व राहिलेलं नाही पण ह्या सर्व भाकिताना नामशेष केले आहे कोकणातील जिल्हा रायगड,तालुका महाड येथील चहू दिशांनी वसलेल्या वाकी गावठाण ग्रामस्थ मंडळाने.कोंकण म्हंटलं की कोकणातील सण हे नेहमी चर्चेचा विषय ठरतात.कोकणातील गणेशोत्सव हा जसा लक्षणीय असतो तसेच कोकणातील शिमगा अर्थात होळी महोत्सव सुद्धा सर्वांना लक्ष वेधायला भाग पाडतो . परंपरेनुसार होळीच्या दिवशी रात्री बाराच्या ठोक्याला गावच्या वेशी जवळ येऊन गावचे जेष्ठ होळीगीत गातात व लाकडा पेंड्याची होळी पेटवली जाते .त्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी पुन्हा जिथे होळी पेटवली तिकडे एकत्र येऊन त्या राखेने सर्वांच्या कपाळी टिका लावून तिलक होळी पार पाडली जाते त्यानंतर त्याच दिवशी दुपारी सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन ग्रामदेवतेची शिवाजी नगर येथे सानेवर पालखी बांधतात व बारा गावातील सर्व मान्यवर चर्चा करून योग्य ते व्यवस्थापन करतात.चर्चा सत्र पार पडले की नियोजनानुसार सोमजाई देवी मंदिरात ती पालखी नेली जाते व मंदिरात आरती करून त्याच दिवशी पालखी पुढे शेवते या गावातील मानकऱ्याच्या घरी बाजा वाजवत नेली जाते. पुढे वाकी येथील गावठाण मानकऱ्याच्या घरी पालखी रात्रभर वस्तीसाठी येते . दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामदेवता सोमजाई देवीची पालखी प्रत्येक खेलींच्या घरी म्हणजे प्रत्येक कुटुंबांच्या घरी नेली जाते .प्रत्येक घरातील काही नवस वगैरे असतील तर ते नमसले जातात , नमस्करी गाराने गातात आणि नंतर लोक नवस फेडतात . नवसाप्रमाणे काहींच्या घरी नैवेद्य असते अर्थात गाव तशी परंपरा म्हणजे काही ठिकाणी तिखट गोडाचा सुद्धा नैवेद्य हा असतो. या जागृत सोमजाई देवीच्या पालखी सोहळ्याला अनेक तालुक्यांतून लोकं ही आवर्जून येत असतात. त्याचबरोबर माहेरवासींनी देवीची ओठी भरण्यासाठी येतात. यंदाच्या वाकी गावठानातील पालखीचे वैशिष्ट्य असे की पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या पालखी सोहळ्याचे नियोजन हे सध्याच्या काळात ज्यांना आपण टेक्नॉ सॅव्ही म्हणतो त्याच युवा पिढी ने केले आहे अर्थात हे नियोजन करताना गावातील जेष्ठ, मान्यवर ,गावच्या मंडळातील अध्यक्ष व शहरी मंडळीतील अध्यक्ष यांचे मार्गदर्शन हे होते.ही पालखी सर्वात प्रथम वस्तीला वाकी गावठाण येथे थांबते त्यानंतर नानेमाची, शेवते,आंब्याचा माळ,खरकवाडी,शेंदूरमळई,नारायण वाडी , पेडामकर वाडी,नांद्रुकाची वाडी,शिवाजी नगर अश्या एकूण बारा गावात पालखी थाटामाटात फिरवून अखेर शिवाजी नगर(सानेवर) येथे विसर्जित केले जाते.हे सर्व व्यवस्थित पध्दतीने प्रत्येक गावच्या तरुण पिढीने पार पडल्यामुळे गावातील जेष्ठ मंडळीने त्यांना आशीर्वाद देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.


शुभम शंकर पेडामकर