औंध-गोपूज मार्गावर अडीच हजार झाडांच्या लागवडीचा कार्यक्रम संपन्न



वृक्षारोपण बरोबर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी रस्त्याच्या ठेकेदारांच्याकडे


औंध:-खटाव तालुक्यातील  गोपूज ते औंध मार्गावर  सुमारे अडीच हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुसेगाव-म्हासुर्णे रस्त्याचे काम करणारी राजपथ इन्फ्रा या ठेकेदार कंपनीकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतवर्षी चार हजार व यंदा अडीच हजार अशी सुमारे साडे सहा हजार झाडे रस्त्याच्या दुतर्फा दिसणार आहेत.
      यावेळी जिल्हा परिषद सदस्य व माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड,माजी सभापती संदिप मांडवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शहाजी देसाई, सुरेश रेड्डी,सपोनि उत्तम भापकर,सरपंच सोनाली मिठारी,महादेव जाधव, बाबासाहेब घार्गे, सोपान खराडे, राजेंद्र माने, संभाजी घार्गे,सचिन शिंदे, गणेश देशमुख,विकास पवार,सचिन पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी बोलताना माजी  सभापती संदीप मांडवे सर्वगोड म्हणाले की, बदलत्या वातावरणात ,जीवनशैलीत निसर्ग हाच आपला खरा सोबती आहे हे कोरोनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे निसर्गाचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वूक्षारोपण करून आपला परिसर प्रदूषण मुक्त ठेवणे आवश्यक आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ कंपनीने सहा हजार पाचशे झाडे लावण्याचा केलेला संकल्प पुसेगाव-औंध-म्हासुर्णे रोडच्या वैभवात भर घालणारा आहे.
                               यावेळी उपअभियंता शहाजी देसाई म्हणाले की, मागील वर्षी लावण्यात आलेल्या झाडांची निगा चांगल्या पद्धतीने घेण्यात आली आहे. यावर्षी पुसेगाव-म्हासुर्णे रोडच्या कामात तोडण्यात आलेल्या सुमारे सहाशे झाडांंच्या बदल्यात पाचपट म्हणजे तीन हजार सहाशे झाडे लावणे गरजेचे असताना सुमारे साडेसहा हजार झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांची देखभाल पुढील दहा वर्षे राजपथ इन्फ्रा कंपनी करणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनीही झाडांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.



फोटो:-औंध-गोपूज रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, संदीप मांडवे,शिवाजीराव सर्वगोड आदी उपस्थित होते.