ते महाकाय झाड़ न हटविल्यास केळघर वासियांच्या जिविताला धोका







मेढा(धनंजय गोरे):-वीज वितरण कंपनीच्या सार्वजनिक डीपी जवळ  धोकादायक महाकाय झाड त्वरित हटवण्याची आवश्यकता असून हे झाड वेळेत न हटवल्यास जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
         मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर केळघर च्या प्रवेशद्वारा जवळ गुलमोहराचे विशाल झाड आहे. या झाडाच्या दोन्ही बाजूने सतत वाहतूक सुरू असते. तसेच दोन्ही बाजूनी नाले असल्याने व पाणी वाहून जाणारी मोरी गाळाने भरल्याने येथे दलदल झाली आहे. या झाडाच्या मुळ्या कमकुवत झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळामुळे वादळ व वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे झाड कराकरा वाजत आहे. वाऱ्यामुळे हे झाड पडण्याची शक्यता आहे. या झाडाच्या खाली उच्च दाब विजवाहिणीच्या तारा व कमी दाबाच्या विहवाहिनींचे जाळे असल्याने हे झाड पडल्यास मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बऱ्याच वेळा मागणी करूनही हे झाड हटवले जात नाही.
           सध्या विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या चार पदरीकरणाचे काम सुरू आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन या रस्त्याच्या ठेकेदाराने पावसापूर्वी हे झाड हटवणे गरजेचे होते. त्यातच सार्वजनिक डीपी जवळ असल्याने स्थानिक ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे धोकादायक झाड हटवावे ,अशी मागणी केळघर चे सरपंच रवींद्र सल्लक यांनी केली आहे.