पिस्तूल घेऊन उभे असलेल्या आरोपीला भुईंज पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

 


भुईंज : वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत

मध्यरात्री सुरूर ब्रिजखाली  पिस्तूल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी प्रसाद शुक्राचार्य बागल (रा. सुरूर, ता. वाई) याच्याकडे झडती घेतली असता ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले .

दि. २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री रात्री सुमारे २.१५ वाजता भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे पोलीस पथकासह हद्दीत रात्रीची गस्त घालत होते. यावेळी त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत सुरूर ब्रिजखाली एक इसम पिस्तूल घेऊन उभा आहे . अशी  खात्रीशीर माहिती मिळाली.

माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने पंचांना सोबत घेऊन तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या सुरूर       पुलाखाली आरोपीचा शोध घेतला. त्याच्याकडे अधिक चौकशी करून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.पोलिसांनी तत्काळ पिस्तूल ताब्यात घेत आरोपीविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८९/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, आरोपीला वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली . आरोपीकडे हे पिस्तूल नेमके कशासाठी होते? त्याचा कोणत्या गुन्हेगारी प्रकरणाशी संबंध आहे का? तसेच हे शस्त्र त्याच्याकडे कोठून आले? याबाबत भुईंज पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व पोलीस कसून चौकशी करत आहेत. 

वरिष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ व सागर मोहिते यांच्या पथकाने मध्यरात्री अंधारातच ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करीत आहेत................................. फोटो- भुईंज पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी सह आरोपी (छाया- अजित जगताप ,भुईंज)