माण तालुका वार्तापत्र
विधानसभेचे कुरुक्षेत्र तापले
(विशाल माने )
देवापुर ..
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीला सुरुवात होत असताना देखील अजूनही कुठलाच उमेदवार ठरत नसल्याने विधानसभेसाठी नंबर लागेल का नाही...? की अजून कोणाला संधी मिळणार याबाबत भावी आमदारांना धडकी भरली आहे. उमेदवारी निश्चित होत नसल्याने तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फजिती होत आहे.
आघाडीतील अनेकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजप-सेना युतीत अफाट भाऊगर्दी केली आहे.
मात्र इच्छूकांची हीच भाऊगर्दी युतीसाठी एकवेळ संजीवनी ठरेल असे वाटत असताना आता मात्र हीच गर्दी युतीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहे.
जिल्ह्यात अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे सेना व भाजपकडून एकाचवेळी एकाच जागेवर अनेकजण इच्छूक आहेत.त्यामुळे नक्की संधी कुणाला मिळेल आणि कुणाची डोळ्यावरची धुंदी ऐनवेळी उतरेल हे आताच सांगणे थोडे घाईचे ठरेल.त्यामुळे युतीतील स्वपक्षीय जुन्या नेत्यांबरोबरच पक्षांतर करून युतीत नुकताच प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांना सध्या आपल्यालाच संधी मिळेल याची शक्यता कमी वाटत असल्याने अनेकांनी प्रचाराच्या वाटेवर न जाता,सध्या अधिक सावधगिरी बाळगल्याचे पहावयास मिळत आहे.
जागावाटपाचे घोडे अजूनही अडले आहे.त्यामुळे कोणत्या जागी कोणता नेता हे अजून निश्चित न झाल्याने कार्यकर्ते मात्र पुरते गोंधळलेले दिसत आहेत.निवडणुका इतक्या जवळ आलेल्या असतानाच आपल्या पक्षाचे उमेदवारच न ठरल्याने असंख्य कार्यकर्त्यांची धांदल उडालेली दिसत आहे.यापूर्वी चार-दोन महिने अगोदरच उमेदवार निश्चित असायचे त्यामुळे आपल्या प्रचाराच्या बदल्यात कार्यकर्त्यांना खर्चपाणी करण्याची जबाबदारी उमेदवार न सांगता उचलतात.यावेळी मात्र एकाही नेत्याने ही जबाबदारी न स्वीकारल्याने कार्यकर्त्यांचे खिसे मात्र रिकामेच दिसत आहेत .
त्यामुळे " खिशात नाही आणा , घरात नाही दाना, आणि मला हवालदार म्हणा" काही अशीच कार्यकर्त्यांची अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.अनेक वेळा ज्या नेत्यांचा कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला होता, अशा नेत्यांनीही आज कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवल्याने नेते केवळ गरजेपुरता वापर करतात आणि काम झालं की सोडून देतात ही अक्कल कार्यकर्त्यांना येते की पुन्हा नोटा आणि दारुच्या मोहिनीपायी कार्यकर्ते स्वतःला त्याच नेत्याच्या दावणीला बांधून घेतात हे पाहावे लागेल.
** माण खटाव मध्ये नेमकं कुणाचं कायकाय ठरलंय?*
मा .आ .गोरे यांनी हाताची ताकद अजमावून पाहिली .सध्या ते विकास या मुद्द्यावर भाजप कडे गेले आहेत .परंतु त्यांना कोणत्याही परिस्थितीत हॅट्रिक करू द्यायची नाही .या इराद्याने सर्वपक्षीय युतीने कोल्हापुरी पॅटर्न राबवत आ .गोरेंचा पाडाव करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे .सध्या माण खटाव मध्ये एकच डायलॉग सर्रास वापरताना दिसतोय तो म्हणजे आमचं ठरलंय! निवडणूक जवळ येत असताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल अशी परिस्थिती आहे .का तर ठरलेल्या माण खटाव मधील पुढाऱ्यांनी कुना एकास बाशिंग बांधून ( सर्वानुमते )बाकीच्यांनी अक्षदा वाटण्याची वेळ असताना मात्र बैठका सुरु आहेत.सर्वपक्षीयांनी तात्काळ उमेदवारी डिक्लेर करण्याची कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहे . अशातच युवानेते शेखर गोरे व मा .आ .जयकुमार गोरेंनी मात्र मतदारसंघ पिंजून काढला आहे . या दोघांचेही वाड्या वस्तीवरील आपापल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचं काम मोठ्या जोमात सुरु आहे .एकंदरीत सर्वपक्षीयांचा एक उमेदवार ,शेखर गोरे .मा .आ जयकुमार गोरे यांच्या अटीतटीच्या लढतीकडे मात्र जिल्हावासियांचं बारीक लक्ष असणार हे मात्र नक्की .
-०-
*युती न झाल्यास आयाराम सरदारांच्या खांद्यावर धुरा..?
सेना आणि भाजपाचे राज्यातील नेतृत्व युती होणार आहे असे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न करत असले तरी राज्यात सध्या घडत असलेल्या घटनांचा अभ्यास केल्यास युती कितपत होईल याबाबत शंका वाटते.भाजपा सेनेत गेल्या महिन्याभरात सुरू असलेली इनकमिंग पाहता भाजपाने दिलेली जागांची ऑफर सेनेला पटणे ह्याघडीला तरी अशक्य वाटत आहे.त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी पुन्हा सुरू होईल अशी शक्यता आहे.त्यामुळे येत्या काळात आयाराम सरदारांच्या खांद्यावर धुरा देऊन स्वबळावर लढतात की युतीच्या गाडीला एकत्रित रुळावर आणतात हे पाहावे लागेल.