माढ्याची लढत प्रतिष्ठेची ...संपूर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष .. राष्ट्रवादीच्या गटातटाचा भाजपला फायदा
विशाल माने / देवापुर ....
माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात तुल्यबळ लढत होत असतानाच फोडाफोडीच्या राजकारणाला मात्र ऊत आला आहे . अकलूजचे मोहिते पाटील हे दिग्गज घराणे व सातारा जिल्ह्याचे काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष व युवक नेते श्री .रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजप मध्ये आणून भाजप ने चालीस चाल खेळली असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा .शरद पवार यांनीही मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक संजय शिन्दे यांना राष्ट्रवादीत घेत राष्ट्रवादीचा प्रबळ उमेदवार म्हणून शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यातच भाजप ने मात्र उमेदवारीबाबत वेट अँड वॉच ची भूमिका घेत वेगवेगळ्या चालीचा डाव आखत माढा मतदारसंघात विजयी निशान फडकवण्याचा पक्का निर्धार केला आहे. नुकतेच भाजपवासी झालेले युवकनेते रणजितसिंह नाईक निंबाळकर किंवा मोहिते पाटील घराण्यातील उमेदवार विरुद्ध संजयमामा शिंदे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या चालीने मतदारांच्यात मात्र संभ्रमावस्था निर्माण झाली असून मतदारसंघात व्हाईट कॉलर पुढाऱ्यांची चौकाचौकात रेलचेल वाढली आहे .
राष्ट्रवादी विरोधी गटाच्या भूमिकेकडे लक्ष :
मागील लोकसभेला सदाभाऊ खोत यांना ताकद देऊन मोहिते पाटलांना हैराण करून सोडणारे व आता महाराष्ट्रभर धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या धनगर आरक्षणाबाबत जनजागृती करत असलेले उत्तमराव जानकर तसेच माढ्यातील राष्ट्रवादी विरोधी गट उघडपणे कोणाच्या पाठीशी राहणार ? यावर भाजप उमेदवाराच्या माढ्यातील विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत . मात्र खा विजयसिंह मोहिते पाटील यांचा औपचारिक प्रवेश बाकी असला तरी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन माढा दौरा सुरु केला आहे .कोणत्याही परिस्थितीत पक्ष देईल तो उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याच्या हेतूने करमाळा, टेम्भूर्णी, माढा पिंजून काढण्यास सुरवात केली आहे .मंगळवारी सांगोल्यात जाऊन त्यांनी भाजप सेनेसह आपल्या समर्थकाच्या भेटीगाठी घेतल्या आहेत . शिवाय कार्यकर्त्यांची निवडणूक यंत्रणाही कामाला लागली आहे .
चौकट : राष्ट्रवादीच्या गटातटाचा फायदा भाजप ला होणार ?
माढ्यातील विशेषतः माण मधील राष्ट्रवादी गटातटात विखुरली असतानाच माण राष्ट्रवादीची मते पक्षाच्या पाठीशी एकगठ्ठा राहणार कि विभागणार ? हे तेथील शेखर गोरे गट, डॉ संदीप पोळ गट, प्रभाकर देशमुख गट यांच्यावरच अवलंबून असणार आहे. तसेच माढ्याच्या रूपाने मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीला दिलेली बगल व अंतर्गत गटबाजी रोखण्याचे मोठे आवाहन राष्ट्रवादी समोर असणार आहे .
चौकट :
कोणता झेंडा घेऊ हाती ???
माढा मतदार संघात विशेषतः अकलूज माढा, सांगोला , माळशिरस भागात रणजितसिंह मोहिते पाटीलांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे कार्यकर्त्यांपुढे मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे .या भागात मोहिते पाटील या घराण्याला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने राष्ट्रवादीत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा हाती घ्यायचा ? या प्रश्नाने चलबिचल होताना दिसत आहे .