आ. जयकुमार गोरे आघाडी धर्म पाळणार की मित्रधर्म पाळणार |
आ. गोरेंसमोर धर्मसंकट, माणवासीयांचे आ.गोरेंकडे लक्ष |

म्हसवड दि. २९ ( महेश कांबळे )

लोकसभा निवडणुकीसाठी माढ्याचा तिढा अखेर सुटला असुन भाजपाने अखेर येथुन फलटणचे रणजीतसिंह नाईक- निंबाळकरांना उमेदवार म्हणुन लॉंच करीत लोकसभेसाठी संजयमामा विरुध्द रणजीतदादा अशी अंतिम लढाई सुरु केली आहे. असे असले तर मात्र या लढाईत कॉग्रेसचे माण- खटावचे विद्यमान आ. जयकुमार गोरे यांना मोठ्या अग्निदिव्यातुन जावे लागणार असल्याने या मतदार संघातील माण, खटाव व फलटणवासीयांचे लक्ष त्यांच्या भुमिकेकडे लागले असुन आ. गोरे हे या निवडणुकीत आघाडीचा धर्म म्हणुन राष्ट्रवादीचे शिंदे यांचे काम करणार की घट्ट मैत्रीचे नाते जोपासत नाईक-निंबाळकरांना आपला पाठींबा देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
 लोकसभेचा माढा लोकसभेचा हा मतदारसंघ अस्तीत्वात आल्यापासुन या मतदार संघाचे नेतृत्व राष्ट्रवादीने केले असुन आजवर पवार साहेब व विजयसिंह मोहिते-पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी या मतदारसंघात मोठी उलथापालथ झाल्यामुळे राज्यातील सर्व जागांचे उमेदवार आघाडी व युतीकडुन जाहीर झाले मात्र येथील उमेदवारीवरुन नेहमीच मोठा पेच निर्माण झाल्याने उमेदवारीचा तिढा हा वाढत गेला. अखेर गत अठवड्यात राष्ट्रवादीने याठिकाणी संजयमामांना उमेदवार म्हणुन घोषित केले तरीही भाजपाने याठिकाणी उमेदवार घोषित न केल्यामुळे दररोज एकाचे नाव समोर येत राहिले. अखेर दि.२९ रोजी भाजपाने माढ्यातुन उमेदवार म्हणुन फलटणकरांना पसंती देत त्यांच्या नावाची घोषणा केली. ही घोषणा करण्यापुर्वी अर्थात पडद्यामागे भाजपाने अकलुजकरांशी मोठा राजकिय तह केला असणार यात शंअसल्या. कोणत्याही परिस्थित माढा जिंकायचाच याच उद्देशाने येथे राष्ट्रवादी व भाजपने गळ टाकले असुन या कोणाच्या गळाला कोण लागणार हे प्रचारादरम्यान समोर येईलच पण याठिकाणी आता कसोटी आहे ती माण- खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची, आ. गोरे हे कॉग्रेसचे आमदार असले तरी त्यांची भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक - निंबाळकरांची मैत्री खास आहे त्यांच्यातील दोस्ताना उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे, एवढेच काय पण रणजीतरावांना कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद आ. गोरे यांच्यामुळेच मिळाल्याचे सर्वश्रुत आहे तर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी राष्ट्रवादीने हा मतदारसंघ कॉग्रेससाठी सोडावा अशी आग्रही मागणी आ. गोरे यांनी श्रेष्ठींकडे केली होती, त्यासाठी त्यांनी पक्षातील नाराजांना एकत्र करुन एक वेगळा दबावगट निर्माण केला होता त्या गटामध्ये संजय शिंदे यांचाही समावेश होता. असे असले तरी सध्या येथील चित्र बदलले असुन आ. गोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे फलटणकरच सध्या या मयदारसंघातुन हाती कमळ घेवुन उभे राहिल्याने मात्र आ. गोरेंच्या समोर मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे. एकीकडे कर्णासारखा मित्र असलेला रणजीतसिंह तर दुसरीकडे श्रीकृष्णासारखे गुरु असलेले पृथ्वीराज बाबांचा शब्द त्यामुळे काहीशी चलबिचल आ. गोरेंच्या मनामध्ये नक्की सुरु झाली असणार. आ. गोरे हे नेहमीच आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर कडाडुन हल्ला करीत आले असुन प्रत्येकवेळी आघाडीधर्म आम्ही पाळला पाहिजे याकरीता कॉग्रेसच्या श्रेष्ठींकडुन सांगितले जाते मात्र हा आघाडीधर्म फक्त लोकसभेलाच का विधानसभेला तो राष्ट्रवादीकडुन का पाळला जात नाही असा उद्दीग्न सवाल ते नेहमीच विचारतात.
      माढा लोकसभा मतदार संघात सातार्यातील माण- खटाव व फलटण हे दोन मतदारसंघ येतात तर सोलापुर जिल्ह्यातील ४ मतदारसंघ येतात त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारी देताना येथे सोलापुर जिल्ह्याला अधिक महत्व दिले आहे. तर भाजपने येथे मात्र थोडासा वेगळा विचार करुन येथे सातार्यातील फलटणकरांना उमेदवारी दिली आहे, फलटणकरांच्या सोबतीला अकलुजकर दिल्याने सोलापुर जिल्ह्यात आपली ताकत वाढेल तर फलटणचा उमेदवार राहिल्याने माण- खटाव व फलटण या दोन्ही विधानसभा मतदार संघात स्थानिक उमेदवार म्हणुन जनता कमळाला साथ देईल असा विचार भाजपाने येथे केला असावा, शिवाय प्रचारादरम्यान आ. गोरेंची साथ मिळेल अशी अपेक्षा भाजपाला नसली तरी रणजीतसिंह नाईक- निंबाळकरांना नक्कीच असणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीची ताकत जास्त असल्याचे बोलले जात असले तरी ही ताकत आता मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे  कमकुवत झाली असल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे भाजपने येथे उमेदवारी देताना सर्व लहान- मोठ्या गोष्टींचा सारासार विचार करुनच येथे आपला उमेदवार घोषित केला असावा. रणजीतसिंह नाईक- निंबाळकरांच्या उमेदवारीने माढ्यातील चित्र फायनल झाले असुन आता प्रचारात कोण, कशी व कोठे आघाडी घेतोय हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. माढा मतदार संघात सातारा जिल्ह्याचा जो भाग येतो त्याठिकाणी आ. गोरे यांचे प्राबल्य जरुर आहे, फलटण सारख्या मतदार संघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे नेते असलेले श्रीमंत रामराजेंची पकड मजबुत आहे तरीही माजी खा. हिंदुराव नाईक निंबाळकर यांना मानणारा वर्ग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, याशिवाय त्यांना मानणारा युवावर्ग माणमध्ये ही असल्याचे दिसुन येतो. हिंदुराव नाईक- निंबाळकर हे शिवसेनेचे खासदार असताना त्यांनी माण- खटाव या दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळावे यासाठी शिखर शिंगणापुर व्हाया म्हसवड ते सातारा अशी काढलेली पदयात्रा अद्यापही येथील जनता विसरलेली नाही याच लढवय्या व्यक्तीचा पुत्र म्हणुन रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना ओळखले जाते त्यामुळे हिंदुरावांच्या आव्हानाला माण- खटावचे शिवसैनिक हे नक्कीच धावुन जातील असे बोलले जात असले तरी राष्ट्रवादीच्या आव्हाला कॉग्रेसजण धावतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चौकट -
आ. जयकुमार गोरे यांचा माण विधानसभा मतदार संघात बोलबाला असला तरी त्यांच्यासमोर एकीकडे मैत्रीधर्म तर दुसरीकडे आघाडीधर्म असा पेच आहे यापैकी ते कोणता धर्म पाळतील त्यावर येथील मतांची बेरीज ठरणार आहे.

शह - काटशह चे राजकारण -
माण- खटावचे आ. गोरे यांचा व फलटणचे श्रीमंत रामराजे नाईक - निंबाळकर यांचा ३६ चा आकडा असुन ते नेहमीच एकमेकावर तोंडसुख घेत असतात फलटणकरांच्या राजकारणाला शह देण्यासाठीच आ. गोरे यांनी दुसर्या फलटणकरांना सोबत घेतल्याचे सर्वश्रुत असुन फलटणकरांना अकलुजकरांचीही अडचण नेहमीच पक्षात वाटत राहिली आहे ते अकलुजकर आता पक्षात राहिले नसले तरी ते दुसर्या फलटणकरांना जावुन मिळाल्याने रामराजेंची ताकत या दोघा तिघांना कितपत टक्कर देईल अशी चर्चा मतदारसंघात रंगु लागली आहे.

फोटो - सदर आर्टीकलसाठी रणजीतसिंह नाईक निंबाळकर, संजय शिंदे व  आ. जयकुमार गोरे यांचे फोटो लावणे.