साताऱ्यात प्रशासकीय गैरकारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात रिपब्लिकन (ए) पक्षाचे बेमुदत उपोषण!
सातारा: सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाललेला प्रशासकीय गैरकारभार, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या धोरणाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत केवळ पत्रकार परिषदा घेऊन घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्ष गैरकारभाराचे पुरावे देऊनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. उलट भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे मानसिक बळ वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे सत्ताधाऱ्यांसह सर्वच विरोधी पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
प्रमुख मागण्या आणि गंभीर आरोप:
- आरोग्य विभागाचे लेखापरीक्षण सार्वजनिक करा: सातारा जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक व संबंधित कर्मचाऱ्यांचा लेखापरीक्षण अहवाल तत्काळ सार्वजनिक करण्यात यावा.
- केबिन दुरुस्तीच्या उधळपट्टीची चौकशी: सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयामध्ये चांगल्या दर्जाच्या केबिन पाडून त्यांची पुन्हा दुरुस्ती केली जात आहे, या उधळपट्टीची सखोल चौकशी व्हावी.
- शासकीय रुग्णालयातील 'टक्केवारी' बंद करा: क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय देयके (Medical Bills) मंजूर करण्यासाठी टक्केवारी ठरवली जाते; अन्यथा त्रुटी काढून प्रस्ताव फेटाळले जातात, अशा भ्रष्ट कारभारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव दादासाहेब ओव्हाळ, जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, पूर्व जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, वाहतूक आघाडी अध्यक्ष संतोष नलावडे, महिला जिल्हाध्यक्ष दामिनीताई निंबाळकर, युवक आघाडी अध्यक्ष राज चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ आणि जनरल कामगार युनियनचे सातारा जिल्हा अध्यक्ष रामभाऊ मदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
सध्या उपोषणाला किशोर डेंगळे, जय भीम गव्हाळे, पूजा साळुंखे आणि गौतम ओव्हाळ हे कार्यकर्ते बसले असून आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
"प्रशासकीय विलंब आणि निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सातारा जिल्हा प्रशासन करत आहे." — राजेंद्र ओव्हाळ (जिल्हा कार्याध्यक्ष, RPI-A)
