अभिनयातून समाजप्रबोधन करणाऱ्या महेश्वर तेटांबे यांचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने सन्मान..!

 अभिनयातून समाजप्रबोधन करणाऱ्या महेश्वर तेटांबे यांचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने सन्मान..!



मुंबई: वृत्तसेवा..

आपल्या दर्जेदार अभिनयातून समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक महेश्वर भिकाजी तेटांबे यांना नुकताच शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे अत्यंत मानाचा 'महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले. मुंबई मराठी ग्रंथालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते गणेश यादव आणि मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या शुभहस्ते तेटांबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लालबाग-परेलसारख्या कामगार वस्तीतील जनसामान्यांच्या ज्वलंत समस्यांवर आपल्या प्रखर लेखणीने आणि अभिनयाने वाचा फोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून महेश्वर तेटांबे यांची ओळख आहे. एकांकिका, नाटके, मालिका, लघुपट, वेबसिरीज आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून अभिनय व दिग्दर्शनाची धुरा सांभाळत त्यांनी आपली कला जपली आहे. विशेष म्हणजे, आपली खाजगी नोकरी पूर्ण निष्ठेने सांभाळत त्यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निरपेक्ष वृत्तीने समाजोपयोगी सेवाभावी कार्य अविरत सुरू ठेवले आहे. कला आणि सामाजिक क्षेत्रातील या दैदिप्यमान योगदानाची दखल घेत यापूर्वीही त्यांना 'जागृत नागरिक', 'जागृत पत्रकार', 'आदर्श नागरिक', 'कलारत्न' आणि 'समाजमित्र' अशा 320 हून अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासात 'महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कारा'ची सुवर्णमोहर उमटल्याने सर्वस्तरातून आणि कला-सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक डॉ. सुकृत खांडेकर, विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आणि शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील भार्गवराम शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते....