मुरूममध्ये सहकार प्रशिक्षण शिबिर संपन्न; पतसंस्था व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

 मुरूममध्ये सहकार प्रशिक्षण शिबिर संपन्न; पतसंस्था व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

(​मुरूम प्रतिनिधी)..



 आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे संचलित सहकार प्रशिक्षण केंद्र, लातूर यांच्या वतीने मुरूम येथील श्री महात्मा बसवेश्वर ग्रंथालय सभागृहात दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार ता. २९ व गुरुवार ता. ३० रोजी पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिराला परिसरातील विविध पतसंस्था आणि बँकांच्या कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​प्रमुख मार्गदर्शक व सहभाग

​या शिबिरात सोलापूरचे नरेंद्र नारायण कुलकर्णी आणि लातूर सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी व उपप्राचार्य गंगाधर जाधव यांनी उपस्थितांना सहकार क्षेत्राचे धडे दिले. पतसंस्थेचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी त्यांनी उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, संचालक श्रीशैल बिराजदार, अमृत वरनाळे, बाबासाहेब पाटील, सौ. संगीता जाधव, व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक दतु गिरीबा यांची प्रमुख उपस्थिती होती.

​मुरूम परिसरातील संस्थांचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूम, ​व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूम, ​माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूम, ​सोमेश्वर पतसंस्था, आलूर, ​सरस्वती पतसंस्था, आलूर, ​लोकहित बिगर शेतकरी सहकारी पतसंस्था, आलूर आदी पतसंस्थेच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

​​सहकारी संस्था, नागरी बँका आणि बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थांच्या कार्यात सुसूत्रता आणणे, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि प्रशासकीय कामकाज नियमांनुसार चालवणे, कर्ज वाटप, वसुलीतील कायदेशीर  बाबींवर सखोल मार्गदर्शन, असे अनेक उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरामुळे परिसरातील सहकार चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास  शिवशरण वरनाळे यांनी व्यक्त केला. 

 फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील बसवेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये सोलापूरचे नरेंद्र  कुलकर्णी मार्गदर्शन करताना