शेटफळे येथील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत आमदार सुहासभैय्या बाबर यांचा आक्रमक आवाज*

 *शेटफळे येथील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत आमदार सुहासभैय्या बाबर यांचा आक्रमक आवाज*

मुंबई / प्रतिनिधी : शेटफळे येथील शेतकऱ्यांच्या शेतातून उच्चदाब वीजवाहिनीचे टॉवर उभारण्यात आले असतानाही ठरलेल्या रेडी रेकनर दराप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याचा मुद्दा खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे उपस्थित केला.

यावेळी बोलताना आमदार बाबर यांनी, "शेतकऱ्यांचा वीज टॉवर उभारण्याला विरोध नाही. मात्र त्यांच्या जमिनीचे नुकसान होऊनही नियमानुसार नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले. ही अत्यंत गंभीर बाब असून शासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना ठरलेल्या रेडी रेकनर दरानुसार नुकसानभरपाई द्यावी," अशी ठाम मागणी केली.

आमदार बाबर यांनी शासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात या विषयाकडे विशेष लक्ष वेधले गेले.

यावर उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी संबंधित प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही सभागृहात दिली.


शेटफळे येथील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमदार सुहासभैय्या बाबर यांनी विधानसभेत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे परिसरातील शेतकऱ्यांकडून स्वागत होत असून, शासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.