महेश करचे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने महावितरण खडबडून जागे; जांभुळणीतील दोन-अडीच महिन्यांपासून जमिनीवर पडलेली विद्युत वाहिनी २४ तासांत दुरुस्त


महेश करचे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने महावितरण खडबडून जागे; जांभुळणीतील दोन-अडीच महिन्यांपासून जमिनीवर पडलेली विद्युत वाहिनी २४ तासांत दुरुस्त

मार्डीसारखी दुसरी दुर्घटना टळली; निष्काळजीपणा पुन्हा खपवून घेतला जाणार नाही, महावितरणला लोकशक्तीचा शॉक दाखवू – महेश करचे



म्हसवड, दि. 2 जुलै : माण तालुक्यातील जांभुळणी येथील राजाराम सोमा काळेल यांच्या शेतातील विहिरीवरील कृषी विद्युत वाहिनीचा पोल २० एप्रिल २०२६ रोजी कोसळल्यानंतर संपूर्ण विद्युत वाहिनी तब्बल दोन ते अडीच महिने जमिनीवर पडून होती. या धोकादायक परिस्थितीबाबत संबंधित शेतकरी आणि जांभुळणीचे उपसरपंच बापूशेठ काळेल यांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. मात्र मार्डी येथील आजी-नातवाच्या मृत्यूप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी ६ जुलै रोजी सातारा येथे महावितरण कार्यालयासमोर आंदोलनाची घोषणा करताच महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले आणि अवघ्या २४ तासांत नवीन पोल उभारून संपूर्ण विद्युत वाहिनी बदलून वीजपुरवठा सुरू केला.

       महेश करचे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जांभुळणी येथील शेतात पडून असलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. शेतकरी, महिला, लहान मुले तसेच जनावरे या परिसरातून नियमितपणे ये-जा करत असतात. अशा परिस्थितीत मार्डीसारखी आणखी एक दुर्दैवी घटना घडण्याची भीती ग्रामस्थ सातत्याने व्यक्त करत होते. तरीही महावितरणने जवळपास अडीच महिने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

         मार्डी येथील आजी-नातवाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि निष्काळजीपणाविरोधात ६ जुलै रोजी सातारा येथे प्रतीकात्मक तेरावा आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर महेश करचे यांनी जांभुळणीतील या धोकादायक विद्युत वाहिनीचाही मुद्दा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आक्रमकपणे मांडला. अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने कारवाईची मागणी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणने नवीन पोल उभारून विद्युत वाहिनी बदलत वीजपुरवठा सुरळीत केला.

        याबाबत प्रतिक्रिया देताना महेश करचे म्हणाले,

"महावितरणला आंदोलनाचा इशारा मिळताच एका दिवसात काम होते, मग दोन-अडीच महिने जनता हेलपाटे का मारत होती? ग्रामस्थांच्या तक्रारींना किंमत नव्हती का? एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार असेल, तर ही व्यवस्था सामान्य माणसासाठी किती धोकादायक आहे, याचा विचार झाला पाहिजे.       ते पुढे म्हणाले,

"मार्डीसारखी दुसरी दुर्घटना जांभुळणीत घडली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार होती? त्या वेळी पुन्हा केवळ चौकशी आणि सांत्वनाची भाषा झाली असती का? प्रशासनाने वेळेत जबाबदारी पार पाडली असती, तर अशा परिस्थितीच निर्माण झाली नसती. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही."

महेश करचे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखेर काम पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभारही मानले. मात्र त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले,

"काम केल्याबद्दल संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. पण हे काम दोन दिवसांत होऊ शकत होते, मग दोन-अडीच महिने का रखडले? भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा करून लोकांचा जीव धोक्यात घालण्याचे धाडस करू नका. जनतेच्या जीविताशी खेळणाऱ्यांना यापुढे माफी नाही."    ते पुढे म्हणाले,

"आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही; तो जनतेच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आहे. शेतकरी जागा झाला तर महावितरणला असा लोकशक्तीचा शॉक बसेल की निष्काळजीपणा कायमचा बंद होईल. प्रशासनाने आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडल्या तर आंदोलनाची गरजच भासणार नाही. पण दुर्लक्ष झाले, तर जनतेच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्यास मागे-पुढे पाहणार नाही."

महेश करचे यांनी सांगितले की, जांभुळणी येथील विद्युत वाहिनी तातडीने दुरुस्त झाल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून अनेक शेतकरी, नागरिक आणि जनावरांचे जीव वाचले आहेत. मात्र हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नाही. माण आणि खटाव तालुक्यात अशा अनेक धोकादायक विद्युत वाहिन्या असून महावितरणने त्यांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी काळात जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

       ६ जुलै रोजी सातारा येथील महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर मार्डी येथील आजी-नातवाचा प्रतीकात्मक तेरावा आंदोलन नियोजित असून, या आंदोलनातून पीडित कुटुंबाला न्याय, दोषींवर कठोर कारवाई आणि संपूर्ण जिल्ह्यातील धोकादायक विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे महेश करचे यांनी स्पष्ट केले...