आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष लेख ...
स्त्रीशक्तीची सबलीकरण आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा होतो. हा दिन केवळ उत्सवाचा नसून महिलांचे हक्क आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रदीर्घ लढ्याची आठवण करून देणारा आहे.
हा दिवस जगभरात विविध संस्था आणि समुदाय यांच्याकडून महिलांनी दिलेल्या कुटुंब, कार्यक्षेत्र आणि राष्ट्र उभारणीत दिलेल्या योगदानाचा गौरव आहे.लैंगिक विषमता कमी करणे आणि लैंगिक भेदभावाबाबत जागरुकता निर्माण करणे तसेच महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा होतो.
*महिला दिनाचा ऐतिहासिक प्रवास*
महिला दिनाची पार्श्वभूमी २० व्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या कामगार आंदोलनात दडलेली आहे.
*१९०८ चे आंदोलन* :
१९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील वस्त्रोद्योग कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी कामाचे तास, कमी वेतन, अन्यायकारक वागणूक आणि मतदानाचा अधिकार या मागण्यांसाठी ऐतिहासिक मोर्चा काढला होता.या आंदोलनामुळे पुढे महिलांच्या हक्कांसाठी जागतिक चळवळीला मोठी दिशा मिळाली. या घटनेला 1908 New York Women Garment Workers Strike म्हणून ओळखले जाते.
यानंतर काही वर्षांनी १९१० मध्ये डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे महिलांच्या हक्कांवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.
*कोपनहेगन परिषद* (१९१०): जर्मनीच्या सामाजिक कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.याला अनेक देशांनी पाठिंबा दिला.
*महिला दिन साजरा* (१९११): जर्मनी, ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिल्यांदा अधिकृतपणे महिला दिन साजरा करण्यात आला.
*८ मार्च हीच तारीख का?*
१९१७ मध्ये रशियातील महिला कामगारांनी ‘भाकरी आणि शांतता’ (Bread and Peace) या मागणीसाठी मोठा संप पुकारला होता. या आंदोलनामुळे रशियाच्या झारला सत्ता सोडावी लागली. तिथल्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. ही ऐतिहासिक घटना ८ मार्च रोजी घडल्याने ही तारीख जागतिक महिला दिन म्हणून निश्चित झाली. संयुक्त राष्ट्रांनी (UN) १९७५ मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली.
*भारतामधील आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास*
भारतामधील आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास २०व्या शतकाच्या सुरुवातीस लक्षात येतो. ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या संघर्षात भारतीय महिलांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे या चळवळीला वेग आला. भारतात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याच्या सुरुवातीच्या नोंदीप्रमाणे १९१७ ची आहे. त्या वेळी बॉम्बे (आताचे मुंबई) येथे महिलांनी मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आंदोलन आयोजित केले होते.
भारतामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन सामाजिक आणि राजकीय जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. विविध उपक्रमांचा मुख्य उद्देश महिलांचे सशक्तीकरण आणि लिंग समानता साध्य करणे हा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सरोजिनी नायडू, ॲनी बेझंट, कस्तुरबा गांधी, अरुणा असफ अली, कमलादेवी चट्टोपाध्याय यांसारख्या महिला नेत्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या सहभागासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक असमानतेकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली. महिलांच्या समानतेसाठी सरकारने अनेक धोरणे आणि उपक्रम सुरू केले. उदाहरणार्थ, महिला आयोगाची स्थापना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी जागांचे आरक्षण तसेच महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारे विविध कायदे करण्यात आले.
*२०२६ ची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना* : ‘गिव्ह टू गेन’ (Give to Gain)
जेव्हा आपण इतरांना, विशेषतः महिलांना पाठिंबा, संधी आणि प्रोत्साहन देतो, तेव्हा त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होतो.
एकमेकांना सहकार्य केल्याने सर्वांचीच प्रगती होते, हा विचार या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे.
आज व्यापक प्रमाणात महिलांच्या संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. स्त्रीवादी सिद्धांतांचा अभ्यास, महिलांचे शिक्षण आणि त्यातील संधी व अडचणी यावर व्यापक संशोधन अपेक्षित आहे. महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या समस्या याच्यावर प्रकाश टाकणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय लिंग आणि उद्योजकता या विषयातून महिलांचा व्यवसाय व आर्थिक क्षेत्रातील सहभाग समजून घेणे गरजेचे आहे. महिलांशी संबंधित कायदे व शासन व्यवस्था तसेच माध्यमांमधील स्त्रियांचे चित्रण यांचाही अभ्यास व्हावा. महिला सक्षमीकरण आणि विकास, लिंगाधारित हिंसा आणि त्यावरील कायदेशीर संरक्षण या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले जावे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या हक्कांसाठी केलेले करार आणि स्त्रीवादी संशोधन पद्धती यांचाही अभ्यास या अभ्यासक्रमात व्यापक प्रमाणात हवा. एकूणच समाजातील महिलांचे स्थान, त्यांचे हक्क, सक्षमीकरण आणि विकास यांचा व्यापक अभ्यास करणे आवश्यक आहे.
आज महिला राजकारण, विज्ञान, व्यवसाय, क्रीडा आणि कला अशा सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, तरीही शिक्षण, आरोग्य आणि समान वेतन यांसारख्या मुद्द्यांवर अजूनही काम करणे बाकी आहे. हा दिवस जगभरातील सरकारे आणि संस्थांना महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि समानतेचे वातावरण निर्माण करण्याची आठवण करून देतो.
महिलांना मतदानाचा अधिकार देणारा न्यूझीलंड हा पहिला स्वराज्य संस्था होता.
महिलांच्या विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्वाचा विचार करता, सरकारी आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये यात वाढ झाली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते याचे बारकाईने निरीक्षण केल्यास अजूनही सुधारणेला बराच वाव आहे.
-डॉ. राहुल पालके,
सहाय्यक प्राध्यापक,
श्री शिवाजा महाविद्यालय बार्शी
(लेखक वुमेन स्टडीज या विषयात 'नेट' उत्तीर्ण आहेत)
