प्रतिनिधी: बार्शी
इंग्रजी ही जागतिक संपर्काची भाषा आहे. श्रवण, संभाषण, वाचन व लेखन ही संप्रेषण कौशल्ये अवगत करणे काळाची गरज आहे, असे मत डॉ. सुमित ननवरे यांनी व्यक्त केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत इंग्रजी संप्रेषण कौशल्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार बापूसाहेब शितोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रमुख डॉ. राहुल पालके, प्रा. किरण खर्डेकर ननवरे सर उपस्थित होते. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी शुभेच्छा दिल्या.डॉ. सुमित ननावरे हे सध्या समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज लोणावळा येथे एप्रिल 2022 पासून इंग्रजी व कम्युनिकेशन स्किल्स विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.प्रतिष्ठित तांत्रिक संस्थांमध्ये त्यांना १० पेक्षा अधिक वर्षांचा रचनावादी अध्यापनाचा अनुभव आहे.
पुढे बोलताना डॉ ननवरे म्हणाले, इंग्रजी संप्रेषण कौशल्ये विकसित करण्यासाठी संदर्भ ग्रंथाचे वाचन करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठी ब्लेंडेंड लर्निंग या संकल्पनेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर विविध देशांचे साहित्य व संप्रेषण कौशल्ये यांचा समन्वय कसा साधता येईल यावर मंथन केले. मेरीटाईम इंजिनिअरिंग, लॉजिटिक्स आदी क्षेत्रांतील संधी त्यांनी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी इंग्रजी संप्रेषण विकसित करण्यासाठी इएलटीएआय या संस्थेच्या कार्यात सहभाग घ्यावा. व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, यूएन एसडब्ल्यू सिडनी , लंडन विद्यापीठ, ड्यूक विद्यापीठ यांच्याद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोर्सेरा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी श्री शिताळे म्हणाले,अभ्यासपूरक व अभ्यासेतर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची धारणा दृढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. राहुल पालके यांनी संप्रेषण कौशल्ये विकसित करण्यासाठी इंग्रजी भाषेतील मासिके, वृत्तपत्रे, जर्नल्सचे वाचन निरंतर करण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर शब्दसंग्रह वाढविण्यासाठी साहित्याचे वाचन कसे उपयुक्त ठरेल याच्या टिप्स सांगितल्या. दैनंदिन व्यवहारातील इंग्रजी संप्रेषण कौशल्ये वृद्धीसाठी त्यांनी भाषा प्रयोगशाळा व संदर्भग्रंथांची उपयुक्तता प्रस्तुत केली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध संप्रेषण कौशल्यांचे प्रात्यक्षिक केले.
