*अर्ज भरण्यासाठी सूचक-अनुमोदक यांचा शोध सुरू, उमेदवारीत तांत्रिक अडचण *
दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी: माण तालुक्यातील बाजार समितीची निवडणूक होऊ घातली असून येत्या 7 ऑगष्टला मतदान आहे. ही निवडणूक रोज वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. या निवडणुकीत हमाल मापाडीच्या उमेदवारीतुन नेतेमंडळी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पुढे पेच निर्माण होणार आहे.
बाजार समितीसाठी हमाल- मापाडी मधून एक संचालक निवडून द्यायचा आहे . यासाठी उमेदवार एकच अन मतदारही एकच आहे. एकच मतदार असल्याने या जागेची निवडणूक होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून भुवया उंचावल्या आहेत. एकच उमेदवार अन एकच मतदार असल्याने या उमेदवारासाठी वेगवेगळ्या गटातून रस्सीखेच सुरू असली तरी हा उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरण्यापासून तो टिकवण्यापर्यंत नेतेमंडळींना तांत्रिक अडचणींचा मुकाबला करावा लागणार आहे,प्रसंगी ही जागा निवडणुकी पासून वंचित ठेवावी लागणार आहे.
कोणत्याही निवडणुकी मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्या उमेदवाराला सूचक व अनुमोदकाच्या सहीची गरज असते.अर्जावर सूचक व अनुमोदक यांची नावे व सही नसेल तर निवडणूक निर्णय अधिकारी छाननीमध्ये अर्ज बाद करू शकतात.
मात्र माण तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत हमाल मापाडी मध्ये एकच मतदार आहे ,त्याला निवडणूक लढवायची म्हटले तरी उमेदवारी अर्जावर सूचक व अनुमोदक हे कोठून आणायचे हा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
या एका उमेदवारासाठी सहकारामध्ये कोणता वेगळा निकष आहे काय हे तपासण्यासाठी माण तालुक्यासह वरिष्ठ नेत्यांपुढे वेगळा पेच निर्माण होणार आहे. तसेच या जागेवर उमेदवार उभा करण्यासाठी कोणती न्यायालयीन लढावी लागणार का या जागेची निवडणूक रद्द करायची या कडे आगामी काही दिवसात जिल्ह्याचे नव्हे तर राज्यातील सहकार क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागणार आहे.
