इंदापूर : प्रतिनिधी (दि. ६जुलै)
बिजवडी (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवड हंगाम सन २०२०-२१ करिता ऊस लागवडीचे धोरण जाहीर करण्यात आले आहे.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील, व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत २०२०-२१ मधील लागवड होणाऱ्या उसाचे गाळप वेळेत होण्यासाठी व एकरी ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढ होण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, यांच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करित ऊस लागवडीचे धोरण राबवण्याचे ठरवले आहे.असे परिपत्रक देखील नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे :
* आडसाली - लागवड कालावधी (१५जुलै ते अॉगस्ट अखेर) को. ८६०३२, को. एम. ०२६५, व्ही. एस. आय. ०८००५
* पूर्व - लागवड कालावधी ( १सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० अखेर) को. ८६०३२,को. सी. ६७१, व्ही. एस. आय. ४३४,एम. एस. १०००१,व्ही. एस. आय. ०८००५
* सुरु - लागवड कालावधी (१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी) को. ८६०३२, को.सी. ६७१, व्ही.एस.आय. ४३४, एम. एस. १०००१, व्ही. एस. आय. ०८००५
* खोडवा - (गळीत हंगाम २०२०-२१ अखेर तुटलेल्या ऊसाचे क्षेत्र) को. ८६०३२, को. सी. ६७१, को. व्ही. एस. आय. ९८०५, व्ही. एस. आय. ४३४, को. ९४०१२, व्ही. एस. आय. ०३१०२, को. एम. ०२६५, व्ही. एस. आय. ०८००५.
यावेळी बोलताना राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तसेच कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ऊस लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे , कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्रयोग शाळेमध्ये माती परीक्षण करून शिफारशी नुसार खत मात्रा द्यावी ,सभासदांनी ऊस उत्पादनवाढीसाठी कारखान्याने तयार केलेल्या कर्मयोगी सेंद्रिय खत कर्मयोगी गांडूळ खत व कर्मयोगी जिवाणू खताचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टीने लागवड पारंपारिक पद्धतीने न करता पाच फूट सिंगल पट्टा पद्धतीने लागवड करावी जे सभासद ऊस रोपांची लागवड करणार आहेत अशा सभासदांनी ऊस रोपांची शेतात लागवड केल्यानंतर शेतकरी गट ऑफिसला लागण फॉर्म भरावा तसेच सदर रोप लागवडीची लागण तारीख शेतात ऊस रोपे लागवड केल्यानंतर एक महिना अगोदर घेतली जाईल असे कळवण्यात आले आहे.
सभासदांनी लागवड पूर्ण होतात त्या क्षेत्राची नोंद त्याच दिवशी ऑफिसला देणे आवश्यक आहे, मागील तारखेची नोंद घेतली जाणार नाही, सभासदाने लागवड सातबारा उतारा देणे बंधनकारक राहील त्याशिवाय नोंद घेतली जाणार नाही, व पीक कर्ज दाखला हमीपत्र दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी या सूचना देण्यात आल्या आहेत.
लागवड हंगाम सन 2020 मध्ये सभासदांनी उसाची लागवड 15 जुलै 2020 ,28 फेब्रुवारी 2019 पर्यंत करावी ते अगोदर व त्यानंतरची नोंद घेतली जाणार नाही याची सभासदांनी नोंद घ्यावी.को सी ६७१ व्हीएसआय ४३४ एम एस १०००१या सुधारित जाती इतर जातींपेक्षा अग्रक्रमाने ऊसतोडणी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.