आभासीवारी अंतर्गत इंदापूर महाविद्यालयात वृक्षारोपण


 
       इंदापूर : प्रतिनिधी :
       
          इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आभासीवारी अंतर्गत इंदापूर महाविद्यालयामध्ये ११३० झाडांचे वृक्षारोपण संस्थेचे सचिव मुकुंद शहा व प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते  करण्यात आले.   
     
       कोरोनाच्या संकटामुळे पंढरीची वारी थांबली आहे. त्यामुळे यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने आभासी वारी ची संकल्पना सुरू करण्यात आली.  या  उपक्रमाला प्रतिसाद देऊन  महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,उपाध्यक्षा पद्मा भोसले,सचिव मुकुंद  शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर महाविद्यालयांमध्ये आभासी वारीचे आयोजन करण्यात आले होते.  या उपक्रमात महाविद्यालय मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ मधील सर्व विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदवला.

       यामध्ये स्वयंसेवकांनी आपापल्या घरी थांबूनच घराच्या परिसरामध्ये फळझाडांची लागवड करावयाची होती. प्रत्येक स्वयंसेवकांनी एक झाड लावून SPPU NSS वारीमध्ये सहभाग नोंदवायचा असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
 
         हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गौतम यादव,विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. तानाजी कसबे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.