मायक्रो फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची आर.पी.आय. कार्याध्यक्षांची मागणी.



इंदापूर : प्रतिनिधी :

            कोरोनाच्या महामारीमुळे रिझर्व बँकेने कोणत्याही कर्जाची वसुली करु नये स्पष्ट निर्देश दिले असतानासुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बँकेचे निर्देश पायदळी तुडवत  महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित कर्जदार महिलांना तगादा लावत असल्याकारणाने इंदापूर शहर व परिसरातील मायक्रो फायनान्स कंपन्याच्या व्यवस्थापक व वसुलीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बारामती लोकसभा मतदार संघाचे आर.पी.आय.चे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी लेखी विनंती वजा तक्रारीद्वारे इंदापूर पोलीसांकडे केली आहे.
      आर.पी.आय.चे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे की,  इंदापूर शहर व परिसरातील मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शहर व तालुक्यातील अनेक महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज रुपी रक्कम उपलब्ध करून दिली आहे.गेल्या तीन ते चार महिन्यांपासून समस्त मानवजात कोरोनाने त्रस्त आहे.सर्वांचा व्यापार, रोजगार बंद आहे. त्यामुळे कर्जाचे हफ्ते देणे अशक्य आहे.तरीही मायक्रो फायनान्सचे वसुलीदार वसुलीसाठी महिलांना दमदाटी करत आहेत.घरातील वस्तू जप्त करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे काही महिला माझ्याकडे आल्या. त्यांनी त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगाची माहिती दिली. असे होत असेल तर आम्हाला आत्महत्या करणे हाच एकमेव पर्याय आहे, असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे.