औंध संस्थानचा लाडक्या गजराजाची एक्झिट;
गजराजाच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त.
औंंध संस्थान व औंध ग्रामस्थांच्या लाडक्या गजराज ऊर्फ मोती हत्तीचे वय(70)बुधवारी सकाळी मथुरा येथे निधन झाले.
सर्वाचा लाडका असलेल्या गजराजाला तीन वर्षापूर्वी पेटा या संस्थेने औंध येथून नेऊन मथुरा येथील वाईल्ड लाईफ केअर सेंटरमध्ये देखरेखीखाली ठेवले होते.
दरम्यान गजराजाची अचानक झालेली एक्झिट औंधकर वासियांसाठी तसेच औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबियांना हुरहूर लावून गेली आहे. गजराजाच्या मूत्युमुळे समाजाच्या सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
औंध संस्थानात म्हणजेच राजघराण्यात गजराज ऊर्फ मोतीचे आगळेवेगळे स्थान होते.1968साली कै.श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांच्या शाही विवाह सोहळयात गजराजाला इंदोर वरुन आणण्यात आले व तिथून पुढे तो जवळजवळ 49वर्षे औंधकरांच्या सान्निध्यात राहिला.
औंध येथे प्रतिवर्षी होणाऱ्या सर्व धार्मिक तसेच राजघराण्यातील सोहळयाची शान हा गजराज. होता.
नवरात्र, दसरा, अष्टमी उत्सव, किन्हई येथील भेट सोहळा,श्री यमाई देवी रथोत्सव, चैत्री उत्सव या सर्व उत्सवांमध्ये गजराजाचा सहभाग हा प्राधान्याने असायचा पूर्वी सोन्याच्या चांदीच्या अंबारीतून गजराजावरुन
सिमोल्लंघनाची शाही मिरवणूक काढली जात असे.
गजराज व औंधकर एक अतूट नाते जडले होते. औंध गावातून नियमित गजराजाचा फेरफटका होत असे.
त्यामुळे आबालवृद्ध, लहान मुले, महिला यांच्याशी गजराजाचे भावनिक नाते जुळले होते.
औंध राजघराण्यातील कै.श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी, कै.बाळराजे पंतप्रतिनिधी यांच्या नंतर गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गजराजाची वेळोवेळी काळजी घेतली .
आवश्यकता असेल त्यावेळी औषधोपचार केले त्याच्या खुराकाची आरोग्याची
काळजी घेतली. मागील चार पिढयांचा गजराज आणि राजघराण्याचा संबंध होता. गायत्रीदेवी बरोबरच राजकन्या श्रीमंत चारूशीलाराजे ,हर्षिताराजे यांनाही गजराजाचा लळा लागला होता.
नुकतीच गजराजाला मथुरेस नेऊन तीन वर्षे पूर्ण झाली होती. त्या वेळोवेळी गजराजाच्या तब्येतीची चौकशी करत असत. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी मागील दिड वर्षापूर्वी कुटुंबियांसह मथुरेला जाऊन गजराजाच्या तब्येतीची पाहणी केली होती.
दरम्यान मागील आठवडयापासून गजराज आजारी होता .मंगळवारी रात्री अचानक गजराजाची तब्येत बिघडली. त्याला पोटाचा तसेच डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला . त्यानंतर गजराजाने कोणत्याही प्रकारचे अन्न व पाणी खाल्ले नाही. गजराजाच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न तेथील पशूवैद्यकीय पथकाने केले मात्र गजराजाचे बुधवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले.
बुधवारी दुपारी ही बातमी औंधकरवासियांंना समजताच ग्रामस्थ, युवक, महिलांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी मागील आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान बुधवारी औंधसह परिसरातील अनेक गावे तसेच खटाव तालुक्यात गजराजाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली .
तीन वर्षापूर्वी पेटा संस्थेने मथुरा येथे गजराजाला हलविले तेव्हा हजारोंंच्या उपस्थितीत अतिशय भावनिक वातावरणात गजराजाला निरोप दिला होता. त्यावेळी ही गजराज ऊर्फ मोती मथुरेस जाण्यास तयार नव्हता. वनविभाग व मथुरा केअर सेंटरचे अधिकारी ,
जिल्हा प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी
कर्मचारी ही त्यावेळी स्तब्ध झाले होते. मात्र बुधवारी झालेली गजराजाची एक्झिट औंधकरवासियांंना हुरहूर लावून गेली आहे. गजराजाच्या एक्झिटमुळे औंधचे वैभव हरपले अशीच भावना व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया..
![]() |
| श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रधान |
.मोतीचे व राजघराण्याचे चार पिढ्यांचे भावनिक नाते होते. पेटा संस्थेच्या हटवादी भूमिकेमुळे त्याला मथुरेला पाठवावे लागले होते. मोती मथुरेला गेल्यापासून राजवाड्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मोतीच्या निधनाची बातमी समजताच मोठा धक्का बसला . आमच्या कुटुंबातील एक सदस्यच हरपला आहे. गेल्या आठवड्यापासून तो आजारी होता. मी दररोज केअर सेंटरच्या संपर्कात राहून माहिती घेत होते. लाँकडाऊन मुळे प्रत्यक्ष जाऊन त्याची भेट घेता आली नाही. ही खंत मनात कायम राहील. गजराज ऊर्फ मोतीच्या आठवणींंनी आज ही मन व्याकूळ होते.
"श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी"
(अधिपती औंंध संस्थान)



