इंदापूर : प्रतिनिधी :
इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे इंदापूर शहर, जंक्शन ता. इंदापूर येथे आज (दि.1) रोजी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आहेत. तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण काळजी करणारे आहे. जनतेमध्ये अलीकडच्या काळात अनलॉकच्या पार्श्वभूमीवर बिनधास्तपणा वाढल्याचे दिसून येत असून. कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून जनतेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन माजी सहकार व संसदीयकार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.
कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. नागरिकांनी शक्यतो गर्दीमध्ये जाणे टाळावे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळणे हा कोरोनाला हरविण्याचा सध्या एकमेव प्रभावी असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे भीती बाळगण्याची गरज नाही, मात्र सध्या 'अनलॉक' ची प्रक्रिया चालू झाल्याने जनतेने अधिक सजग राहणे आवश्यक आहे. जनतेने सहकार्य केल्यास इंदापूर तालुका कोरोना मुक्त राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट : पंतप्रधानांचा मोफत धान्याचा निर्णय स्वागतार्ह : हर्षवर्धन पाटील,भाजप नेते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार मार्फत देशातील 80 कोटी जनतेला येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत 5 महिने प्रतिमहिना, प्रतिमाणसी 5 किलो गहू किंवा तांदूळ तसेच प्रत्येक कुटुंबास 1 किलो डाळ मोफत देण्याचा घेतलेला निर्णय सध्याच्या कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या जनतेच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय स्वागतार्ह असल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.