पिंपोडे बुद्रुक - (अभिजीत लेंभे)
आपली शिक्षक बँक ही राज्यात शिक्षकांच्या बँकात प्रतीत यश प्राप्त केलेली बँक असून शिक्षकांच्या पगारातून कर्जांच्या हप्त्यांची वसुली विनासायास व विना-अडथळा होत असते. परिणामी इतर बँकांप्रमाणे वसुलीसाठी शिक्षक बँकेला दारोदार फिरावे लागत नाही. शिक्षक बँकेच्या *थकबाकीचे प्रमाण ही येणे कर्जाशी शेकडा १ ते १.५ टक्के असते*. बँकेचा यावर्षीचा *नफा ४.५० कोटी पेक्षा* जास्त आहे. तरीही सभासदांना जादा लाभांश देण्याचे आमिष दाखवत भुलविणे पेक्षा कर्जदार सभासदांचे कर्जावरील व्याजदर कमी करून त्यांना लाभांशापेक्षा जास्तीचा फायदा करून देणे गरजेचे आहे. याकरिता *विविध कर्ज प्रकारातील कर्जांचे व्याजदर तातडीने कमी करण्याची मागणी* शिक्षक समितीच्या वतीने बँकेचे संचालक किरण यादव ,सुभाष शेवाळे ,चंद्रकांत मोरे व शिवाजी शिंदे या संचालकांनी केली आहे.
नुकतीच रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केली आहे. ज्याप्रमाणात रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केली आहे त्याप्रमाणात ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याचे आवाहनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकतेच केले आहे. गेल्या महिन्यात रिझर्व बँकेने रेपोदरात ०.४०% घट करून तो आता केवळ ४% केला आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर श्री शक्तीकांत दास यांनीही पतधोरण जाहीर करताना व्यवसायिक बँकांनी कर्जावरील व्याजदर शक्य तितक्या लवकर कमी करावेत असे सांगितले आहे.
गत वर्षात आपल्या शिक्षक बँकेने व्याजदरात फार थोड्या प्रमाणात कपात केली आहे. परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात रेपो दरात कपात झालेली आहे. त्यामुळे रेपो दराच्या प्रमाणात कर्जावरील व्याजदर कमी करण्यास कोणतीही अडचण नाही.
आपल्या बँकेचे घरबांधणी , शैक्षणिक व वाहन तारण कर्ज सध्या ९.५० टक्के दराने आहे. या तिन्ही कर्जांचे व्याजदर ८.५० टक्के करावा. तसेच विना जामीन कीचे आकस्मित कर्जाचा व्याजदर १२.९० टक्के वरून ११% करावा.
सभासदांचे गेले अनेक वर्ष मागणी असलेले व सर्वाधिक खप असलेले कर्ज प्रकार म्हणजे दीर्घ मुदत कर्जप्रकार होय. या *दीर्घ मुदत कर्जाचा व्याजदर ११% करावा*.
सेवानिवृत्त सभासदांना दिले जाणाऱ्या सर्व कर्ज प्रकारांचे व्याजदर कपात करून तेही ११% दराने व्याज आकारणी करावी.
वरील सर्व बाबींचा योग्य व सहानुभूतीपूर्वक विचार करून व्याजदर कमी करून सभासदांना दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षक समिती सातारा जिल्ह्याच्या वतीने संचालकांनी चेअरमन शिक्षक बँक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत योग्य तो विचार न झाल्यास व व्याजदर कमी न केल्यास पुढील दिशा ठरवून शिक्षक सभासदांना न्याय देण्यात येईल. असे शिक्षक समितीच्या संचालकांनी सांगितले.