ग्रामीण शेती. कुळव.

         कुळव.
                   



               पाडवा चार दिस म्होरं हाय, तवरच सगळ्यां शेतकऱ्यांना कुळवाच्या पाळीचं येद लागायचं. मग सगळी लगबग ही भोसले आळीला खाश्यादादांच्या घराकडं लागायची. कोण जमलं तसं आपापलं काम घेऊन खाश्यादादांकडं याचा. मग कुणाचं जाणावळं, रुमनं, खिळ्यांचं,आळंदांडी, शिवाळ तर कुरी, तिफणीच्या दिंडाचं, फणाचं बी काम असायचं.
                एक एक जण दिस उगवायला आपल्याला लागणाऱ्या अवजाराच्या मापाचं एखादं नवं जुनं लाकडी दांडकं न्हायतर बुडका घेऊन खाश्यादादाच्या सोप्यात जाऊन बसायचा. आक्षी चहाच्या टायमाला जायाचा. त्याचं तरी काय चुकायचं म्हणा? सगळी जण तहान लागल्यावरच आड काढायला लागायची. त्यामुळं सगळी उठायची ती तडक खाशादादांच्या घरावरच आपला मोर्चा न्याची. अन नेमकं त्याच टायमाला खाश्यादादा आडावर पाणी आणायला गेलेलं असायचं. पाण्याची घागर घेऊन येईस्तोवर सारं अंगाण माणसांनी भरल्यालं असायचं. जणू वाडीची चावडी भरल्यावाणी खाशादादांच्या घराचा सोपा भरायचा. त्यातल्या बर्याच जणांनी नगं नगं म्हणत सकाळपासन एक एक चहाचा कप रिजावल्याला असायचा.
               दादा कसा तरी चहा न्याहरी करून अंगात दंडकी घालून कमरंला धोतार खवत कोपर्यात उभी केल्याली हत्यारं बाहेर काढून कामाला सुरुवात करत. अन एकमेकांच्या गप्पा-टप्पाच्या फुडणीनं एक एक काम हाताबाहेर करत असंत.
            ज्याचं काम झालंय त्यो मातीतली कुस्ती जिकलेल्या पहिलवानासारखा विजयी मुद्रेनं घराकडं झपाझपा पावलं टाकत जायाचा. काय करणार? कवा यका सकाळी गेल्याला गडी पार गुरं सुटायच्या वक्तालाच घरात हजर हुयाचा. गुरांनी हंबरून हंबरून परडा नुसता डोक्यावर घेतल्याला असायचा. आपलं मालक घरला उशिरा आलं म्हणून घरमालकीण एका शब्दानं त्याला बोलायची न्हाय. उलट काम झालं म्हणून खुश हुयाची. अन याच खुशीच्या आनंदात त्याला जेवायला वाढायची. तोंडी लावायला काराळ्याचं कुठ, पापुड,भातवडी,भुईमुगाच्या शेंगा द्याची.
               मग एक दोन भाकरीचा काला करून पोटभर जेवल्यावर, गडी परड्यात जावून गुरं सोडून आडावर पाणी पाजून त्यांना चरायला वर डोंगराला हाक्काल्ली जायाची. अन मग परड्यात येवून औत काठी जोडत बसायचा. त्यातच एखादा पुढं निघाल्याला गडी दिसला तर त्याला हाक मारून बोलवून घेतलं जायचं. इकडच्या-तिकडच्या गप्पा हुयाच्या. मग बोलण्याच्या नादात आपण किती वकुत बसलो याचं भान आल्यावर इच्छु चावल्यावाणी ताडदिशी उठून बसणारा गडी आपल्या आल्या मार्गाला लागायचा. एक मातूर हुयाचं, त्यो बाता हाणत दुसऱ्याला मदत करायचा ती बी निस्वार्थी. त्या बदल्यात त्यानं घेतला तर एखादा तंबाखूचाच 'आर' घेतला जायाचा.
               सारी वावरं नांगरटी होऊन उन्ह खात पडल्याली असायची. उकिरड्यातली खातं वडून झाल्याली असायची. कुणाचं खात ईस्कटल्यालं तर कुणाच्या वावरात  खताच्या ढिगुल्या तशाच पडून  असायच्या. उन्हाळी एक दोन पाऊस झाल्यालं असायचं. कवा ऊन तर कवा सावलीचा खयोळ चालू असायचा. दमदार पाऊस झाल्यानं ढेकळं आपल्या अंगावर पापुड वडून पडल्याली असायची. ज्यो त्यो पाडव्याची वाट बघत बसायचा. कुणाला कुळव धरायचा, तर कुणाला नुकतंच दात लावल्यालं रगिल ख्वान्ड औताला हेळवायचं काम असायचं. म्हणून ज्यो त्यो आपापल्या तयारीला लागल्याला असायचा.
                आजवर ज्याची चातकासारखी वाट बघितली त्यो वळीव नेमका वाजत गाजत आक्षी टायमाला यमाईच्या डोंगरावर उतरायचा. डोंगरावर काळ्या ढगांची दाटीवाटी करायचा. मधीच इज कडकडाट करत लवायची. ढगांचा अन इजचा बराच येळ ह्यो खयोळ चालायचा. अन आला आला म्हणतस्तवर साऱया शिवारात नुसतं पाणी पाणी करायचा. सगळ्या वड्या वगळी, ताली, बांध भरून वाह्याचा. त्यात कुणाच्या ताली, बांध वाहून जायाचं, कुणाचं सपार पडायचं,पत्रं उडून पडायचं, घरं गळायला लागायची , भिताडाच्या पडझडी हुयाचया , गंजी , बुच्याड उडून जायाची , झाडं पडायची .कवा कवा तर एखादं  म्हातारं-कोतारं माणूस, न्हायतर दुधदुभत जनावर बी दगवायचं. आईनधपक्या पावसामुळं लई नुकसान हुयाचं. अन ते निस्तारता निस्तारता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ याचं.
                  दुसरया दिशी साऱ्या शिवारात शिंगरं अन पखं फुटल्यालं तेल मुंगळं उडताना दिसायचं. अन ते आपल्या नाजूक चोचीनं उडत उडत टिपताना साळुंख्या, येडा राघू या सारखी पाखरं दिसायची. अन ह्यो जीव वाचवायचा चालल्याला खयोळ बारकी पोरं पोरी तासन तास बघत बसायची. कवा कवा तर  कोंबड्यांच्या टापूत आल्यालं हे तेल मुंगळं कोंबड्या ताणून ताणून टीपायच्या,अन चोचीत पकडल्यालं तेल मुंगळं चोची जमिनीवर आपटून आपटून फस्त करायच्या. यातच एखादी लेकुरवाळी कोंबडी असंल तर ती आपल्या पिलाला त्याचं जगण्याचं तंत्र शिकवायची , पिल्लं बी ची'''  ची''' करून हे सगळं शिक्षाण शिकत असायची. कोंबडीची कुर्रर कुर्रर अन तिच्या पिलांची ची ची बघायला लई मजा याची .
           पावसाच्या लालभडक पाण्यानं भरल्याल्या ताली उन्हात चमचम करायच्या. जणू पोरांना त्या तालीत साठलेल्या पाण्यात पवण्यासाठी या म्हणून खुणावत असायच्या. मग पोरं माळाला गुरं चरायला सोडून तालीतल्या खडूळ कमरंभर पाण्यात नागड्यानं दिवसभर पवत बसायची. अगदी डोळं लाल भडक हुस्तवर, त्यांचा ह्यो खयोळ चालायचा. अन मधीच एखादा कोण पवायचं थांबला तर त्याच्या पाटी पोटाला चिकूल माती फासून परत त्याला पवायला लावायचा. न्हाय ऐकला तर त्याची उचल-बांगडी करून पाण्यात टाकायचा. खडूळझ्यार पाण्यात पवल्यामुळं  हातापायाची बोटं पार किर्वांजून जायाची. मनसोक्त पवल्यावर कोण वढया वगळीला जाऊन खेकडं पकडायला लागायचा.बारीक-मोठी दगडं उलती पालथी करताना दिसायचा. तर कोण पाताळ न्हायतर धोतराच्या धडप्यात धारंला चिंगळी मासं पकाडताना दिसायचा. काय बी करून सांच्याला कालवणाची तजवीज करायचा. अन पोरांनी असं खेकडं मासं धरून आणलं मजी पोरांचं आई-बाप घरात लई कौतिक  करायची .
                आठवडाभर पावसानं उघडीप दिल्यावर वढया-वघळीचं पाणी व्हायाचं कमी हुयाचं. वढयातली मोठमोठी दगडं उघडी पडून पांढरीफक दिसायची . माळातल्या तालीत राहिलेल्या पाण्यात मसरं पाणी पिऊन त्यातच मटकन बसकण घालायची. त्या घोटभर पाण्यात अंग घुसळून साऱ्या अंगाचा  राडा करायची. जवळच्याच गवताच्या ठोंबाला शिंगानं धडका देऊन उकऱ्या काढून शिंगं, कपाळ चिखलानं पार लडबडून टाकायची. मसरांचा ह्यो अवतार बघून लढायला चिलखत घालून तयार झालेल्या सैनिकाचा भास हुयाचा .
                   ज्या तालीतलं पाणी आठलं असंल, त्या तालीतल्या चिखलानं पापुद्रे धरायला सुरवात केलेली असायची. अन हे त्रिकोणी, चौकोणी, पापूद्रे मग गुरांकडं असणारी पोरं-पोरी खेळणं म्हणून त्याचा वापर करायची. अलगद पापुद्रा उचलून त्यो वट्यात घेऊन  त्याच्या चकूल्या, भातवड्या असलं बरंच काय- बाय खेळ खेळलं जायाचं. कवा कवा त्यात चपात्या-भाकरी म्हणून हिरव्यागार करंजाच्या पानांची बी भर पडायची. कवा कवा तर लुटुपुटूची नवरा-नवरी, भांडीकुंडी ह्यो असला खयोळ  खेळला जायाचा .
                आता वावरासनी बऱ्या पायकी घाती आल्याल्या असायच्या. त्यामुळं ज्यो त्यो कुळव जोडायला घ्याचा. पयरा करायला लागायचा. ज्याचं वावरात खात इसकाटायचं राहीलंय त्यो बायका पोरं घेऊन सकाळ संध्याकाळ खात ईस्कटून घ्याचा. सगळं खात ईस्कटून झालं मजी चांगला वार बघून कुळव जुपायचा. मग त्यात नवाट ख्वान्ड बी हेळवून काढायचा. या वर्षीच्या हेळावण्यानं त्यो खोंड लहान सहान औताला तयार हुयाचा. जसं की छकडा,रासणी, बाभळीचा हेल वढून आणण्यासाठी त्याला जुंपलं जायाचं. कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्या दिल्या जायाच्या .मग एक एक वावार एक सारखं मउझ्यार हुयाचं. कुळावताना एखादया वावरात एखादा दगुड लागायचा. मग त्यायेळी कुठं जाणावळंच मोड तर कुठं कुळवाची पासच वाक असलं प्रकार हुयाचं. अन मग  कुळवाचा घोटाळा हुयाचा. मग जिथं दगुड लागलाय ती जागा खूण करून त्यावरली संमधी माती बाजूला केली जायाची तयो दगुड उघडा करून ठेवला जायाचा . जेणे करून पुन्हा पेरताना कुरीच्या फणाला त्यो दगुड लागू नये म्हणून काळजी घेतली जायाची.
              वावरात कुळव मारून झाला मजी सड-काश्या येचायला सुरुवात हुयाची . ही सड काश्याची वावरं कुळवायला लई ताप हुयाचा , कारण कुळवाला या सड काश्याचं *वसाण* लागायचं , अन ते काढण्यासाठी कुळव कासरा- भर पुढं न्हाय गेला तवर उभा कराय लागायचा .मग कुळव एका अंगाव उभा करून खुरप्यानं वरून खाली अन खालन वर पासंला लागलेलं चगाळ चोथ्याचं वसान वसायचं .त्यात उन्हामुळं सारखी तान लागायची .सारखं सारखं कुळव उचलून उचलून अन पाणी  पिऊन नळ फुगायचं .वाट
सरायची असलं काय तरी प्रकार हुयाचं . मग औत्या गडी असू दे न्हायतर बारकाट पोरगं तिथं कुणाचा  इलाज न्हाय चालायचा .मग अनूशापोटी  एखादया पोटात चोळणाऱयाकडून पोट चोळून घेतलं जायाचं .ते बी विना मोबदला . तेवढं करून बी दोऱ्यानं पायाचं अंगठं बांधायला लागायचं.
                  कुळावताना वावार जर मोगणाचं न्हायतर भुईमुगाचं असलं तर मग इचरायची सोयच न्हाय?का? तर अश्या भुंड्या वावरात वसान कमी लागायचं . त्यामुळं एकदा कुळव वावरात घातला मजी ह्या कडंची त्या कडंला कुळवाचं तास घातलं जायाचं. पाक न थांबता अगदी *आडतास* झाल्यावरच कुळव वावरातन बाहेर काढायचा .मधी आधी कवा तरी वसाण काढायला लागायचं .बाकी कुळवाचं नुसतं भिरकीट काढायचं . आनंदाच्या भरात हुकी आली मजी एखादं कवाण हुयाचं,"माझ्या बाळाला ,सोन्या बैलाला,''''''शिलीदाराला वढं लावावं -वढं लावावं,हां....बैली रायाला,माझ्या सोन्याला यावं यावावं र र र आ पोपट, उल्हा उल्हास हां....!"
             पण ऐन पेरणीच्या वक्ताला जर पावसाची उघडझाप होऊन बुरुंगाट पडत असंल तर वसाण काढून काढून अन कुळव उचलून औत्याचा जीव आक्षी  काकुळतीला याचा नकं जीव हुयाचा. कुळवून ,सडकाशी येचुन वावार चांगलं केलं मजी पेरणाराला पेरायला त्रास हुयाचा न्हाय अन पेऱ्याची मुठ एक सारखी सुटून उगवून आल्यावर सऱ्या दिष्ट लागाय जोग्या हुयाच्या .मग वावरात सकरातीच्या गाडग्याला चुन्यानं त्वांड , डोळं काढून वावराच्या मधी उभं कराय लागायचं .
             एवढं सगळं याप  केल्यावर मग वावार हाताला याचं .मग त्यात पाहिजे त्यो बी बिवळा पेरला जायाचा.मग घातीव बी टरारा फुगून वर याचं एखादया पोरांनं लपा छपी खेळताना आपल्या अंगाव एखादं टोपलं घेऊन बसावं अन डाव झाल्यावर ते टोपलं हळूच बाजूला करून मुंडकं दावावं त्या प्रमानं एवढ्या दिवस माती आड लपल्यालं बी हळूच वर याचं अन नव्या नवतीचं दरशान करायचं . अन उगवून आल्यालं बी बघून त्या शेतकऱ्याचा आनंदानं उर भरून याचा.केलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणून त्याचं हात आपोआप शेतसरी,अशी यमाईला अन मसुबाला जोडलं जायाचं ."एक घात अन बारा गाड्या खात"बाबा म्हणायचे ते खरं हाय.
           ......आणि आता एवढ्या सुख सुविधा झाल्या ,नवनवीन तंत्रज्ञान , यांत्रिक औजारं आली तरी ती माणसाला वेळेवर वापरता येत नाहीत . एकदा पेरल्यावर काढायलाच जायाचं , आणि नाही पिकलं तर निसर्गाला दोष देत बसायचं .काय करणार ? ही "तहान लागल्यावर आड काढल्या सारखी अवस्था आहे . झटपट आणि जास्तीचा हव्यास माणसाला नडतो आहे,
म्हणूनच तर अवेळी पाऊस पाणी पडतो आहे.आणि जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा आज रडताना आणि गळ्याला फास लावताना दिसतो आहे .काय करणार अंग मोडून घाम गाळून शेतात राबणारे हात आता माती आड झाले आहेत !"

लेखन-

आनंदराव रामचंद्र पवार.[औंध]
जॅतापूर-सातारा.
मो.नं.--9881791877