इंदापूर : प्रतिनिधी -
झी २४ तास व पुढारी वृत्तपत्राचे इंदापूर तालुका प्रतिनिधी पत्रकार जावेद मुलाणी यांचे वडील मुबारक पापाभाई मुलाणी ( वय ७१ ) यांचे रविवार दिनांक २८ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अकलूज ( जि. सोलापूर ) येथे खाजगी रुग्णालयात गेले २१ दिवस उपचार सुरू होते. मात्र २१ व्या दिवशी उपचारादरम्यान सकाळी ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली( विवाहित ) सुना नातवंडे असा परिवार आहे. निमगाव केतकी येथे दि.२८ जून रोजी दुपारी ३ वाजता शोकाकुल वातावरणात त्यांचेवर दफन करण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते संस्था आजीव सभासद होते. तसेच त्यांनी ४६ वर्षे नाईक पदावर नोकरी देखील केली आहे. त्यांचा मुस्लिम समाजासह इतर क्षेत्रात,सामजिक कार्यात मोलाचा सहभाग होता.
आब्बा या नावाने सर्वांना त्यांचा परिचय होता. त्यांच्या निधनाने निमगाव केतकी परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, राजवर्धन पाटील, देवराज जाधव, नानासाहेब शेंडे यांनी मुलाणी परिवाराला भेट देऊन सांत्वन केले.