इंदापूर : वार्ताहर
रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत ;वित्तीय संस्थेच्या वसुली संदर्भात चौकशी करावी
: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश
तालुक्याच्या महत्वाच्या भागातील अपघातांना निमंत्रण देणारे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून टाकावेत. बचत गट व इतर वित्तीय संस्थांकडून होणा-या सक्तीच्या हप्ता वसुलीसंदर्भात चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधितांना दिले आहेत, अशी माहिती 'शेतकरी कामगार बेरोजगार अपंग हक्क परिषदे'चे संस्थापक अध्यक्ष सागर मिसाळ यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले की, इंदापूर, बारामती, डाळज, जंक्शन हा भाग व वालचंदनगर ते बावडा, इंदापूर ते सराटी या रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे
पडले आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा जुनी अवाढव्य व सोसाट्याच्या वादळी वा-याने कधी ही उन्मळून पडतील अशी झाडे उभी आहेत. काही पडलेली आहेत. अपघात घडू नये या साठी या दोन्ही बाबींसंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी.
बचत गट, मायक्रो फायनान्स, फायनान्स, वित्तीय संस्था, पतसंस्था विविध बँका, महामंडळाचे हप्ते सप्टेंबर ते ऑक्टोंबरचे हप्ते रिझर्व्ह बॅकेच्या आदेशावरून थांबवण्यात यावेत. मार्च ते ऑक्टोबर महिन्याचे व्याज माफ करावे, या दोन्ही बाबत संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्पेश यादव,जिल्ह्याचे कोषाध्यक्ष पिंटू नरुटे, दिलीप लोहकरे, दादा कांबळे, पप्पु कोळी, प्रताप जगताप, शेखर काटे, रिकिबे, अनिल शिंदे व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत (दि.१४ जून) रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्याची दखल घेवून राज्यमंत्री भरणे यांनी उपरोक्त आदेश दिले. येत्या आठवड्यात प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात होणार आहे, असे मिसाळ यांनी स्पष्ट केले.
