इंदापूर शहरातील कोरोनाग्रस्त वृध्दाचे पुण्यात निधन * शहरातील कोरोनाचा पहिला बळी.



इंदापूर  :  वार्ताहर
          जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पुण्याच्या रुबी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ७७ वर्षीय कोरोनाग्रस्त वृध्दाचे रविवारी (दि.१४ जून)  रोजी रात्री     साडेदहाच्या   सुमारास तेथेच निधन झाले. शासकीय नियमानुसार पुण्यातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
       शहरातील दर्गा मस्जिद चौक परिसरातील रहिवासी असणारा हा वृध्द दोन महिन्यांपूर्वी सोलापूरला आपल्या मुलीकडे गेला होता. लाॅकडाऊनमुळे तेथेच तो अडकला.तेथे आजारी पडला. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवारी आपल्या पुतण्या समवेत तो इंदापूरला आला होता. रक्तदाबाच्या आजारामुळे तपासणीसाठी येथील एका खाजगी रुग्णालयात गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील तपासणीसाठी पुण्याला जाण्यास सांगितले. रुबी हाॅस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. तेथे पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.दुसरी चाचणी पाॅझिटिव्ह आली. त्यानंतर त्याच्यावर तेथेच उपचार सुरु होते.
  त्याच्या मृत्युमुळे कोरोनाचा हा शहरातील पहिला तर तालुक्यातील दुसरा बळी ठरला आहे.