धामणी देवराईत मा.अक्षय खाडे यांच्या हस्ते विवाह दिनी वृक्षारोपण



म्हसवड : प्रतिनिधी..

धामणी येथील खाडे नवदाम्पत्याने
लग्नाच्या दिवशी वृक्षारोपण करुन आदर्श निर्माण केला.
        धामणी गावचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्डाच्या महापारेशन विभागाचे सहाय्यक अभियंता मा.अक्षय खाडे व त्यांच्या नव्याने विवाहबद्ध झालेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियर सौभाग्यवती अश्विनी खाडे या नव दांपत्याने धामणी गावात सध्या जोरात सुरु असलेल्या वृक्षारोपण व वृक्षसंगोपनाच्या चळवळीत आपल्या विवाहदिनी वृक्ष लागवड करून  सहभाग नोंदविला.

त्यातून त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.विवाहाने पती-पत्नीमध्ये आयुष्यभराचे एक अतूट असे नाते निर्माण होते.तशाच प्रकारे आयुष्यभरासाठी वृक्षाबरोबर ही पुण्याईच्या मैत्रीचे अतूट नाते निर्माण व्हावे.या एकाच वृक्षप्रेमाच्या भावनेतून नवविवाहीत खाडे दांपत्यानी आपल्या लग्नाच्याच दिवशी शासनमान्य नियमांचे पालन करून व योग्य सोशल डिस्टन्सिंग ठेऊन धामणी गावातील वाघजाई सहयाद्री देवराईत वडाच्या झाडांची लागवड केली.'वृक्ष माझा सांगाती' वृक्ष हे देखील माझे सगेसोयरे आहेत.हीच त्यांची वृक्षाबद्दल असणारी आपुलकीची भावना समाजापुढे निश्चितच आदर्शवत राहील. सध्याला मा.सतेशकुमार माळवे सर व मा.प्रकाश खाडे या समाजसेवक वृक्षप्रेमी वृक्षमित्रांनी वृक्षलागवड व वृक्ष संगोपनासाठी  धडपड चालविली आहे.ती धडपडच अक्षय खाडे यांनी पाहिली. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेतली व स्वतःच्या विवाहदिनापासून वृक्षलागवड व वृक्षसंगोपनाचे कार्य करण्याचे मनोमन ठरविले. सह्याद्री देवराईतील वृक्षलागवड व वृक्षसंगोपणाच्या कामासाठी बराचसा खर्च हा येत असतो.तेव्हा त्यांनी लग्नसमारंभात काहीशी काटकसर करून पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांची देणगी ही या सह्याद्री देवराईसाठी दिली आहे.
          विवाहदिनी या वृक्षलागवड उपक्रमाच्या प्रसंगी मा.सतेशकुमार माळवे सर ,मा.प्रकाश खाडे,मा.विलास खाडे,मा.संदीप खाडे,मा.किरण खाडे  हे  मान्यवर उपस्थित होते.सध्या या विवाह दिनाच्या वृक्षारोपण उपक्रमाचे फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठे कौतुक होत आहे.यात प्रामुख्याने सिने अभिनेते मा.सयाजी शिंदे,पुणे येथील भूमीसंपादन अधिकारी मा. सुरेखाताई माने मॅडम,पानी फाउंडेशन टीमचे उच्च स्तरीय समन्वयक मा.अजित पवार,सहयाद्री देवराईचे समन्वयक मा.योगेश गायकवाड तसेच माण तालुका व धामणी गाव पानी फाउंडेशन टीममधील अनेक वृक्षप्रेमी मंडळींनी या विवाहदिनाच्या वृक्षलागवड उपक्रमाचे अभिनंदन केले.