आटपाडीत 'कलामल्हार' चॅनलच्या शीर्षक गीताचे अनावरण



आटपाडी /  प्रतिनिधी:
आटपाडी येथील सम्यक-जीवन फिल्म्स अँड म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये 'कला मल्हार' या चॅनलच्या शीर्षक गीताचे अनावरण साहित्यिक व कवी ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आटपाडी येथील भारत कलावंत निर्माण फाऊंडेशनचे प्रमुख,निर्माते प्रा.सुरेश गायकवाड, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचे सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके, स्टुडिओचे मालक सचिन वाघमारे, देवानंद भोरे, संगीत विभागाचे प्रमुख एम.प्रकाश, नरेंद्र दीक्षित, प्रसिद्ध ढोलकीपटू दिग्विजय जावीर, संकलक सनी धुमाळे, समाधान भजनावळे,चैतन्य गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कवी ज्ञानेश्वर डोंगरे म्हणाले, ग्रामीण भागामधील लोकांमध्ये अनेक कला दडलेल्या आहेत. त्यांच्यातील या कला शोधून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम आपल्या भागात सुरू झाले. त्यामुळे कलाकारांना आपल्या उपजत कलांचे  प्रकटीकरण करण्यास संधी मिळणार आहे.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राचे सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके म्हणाले, ग्रामीण भागातील कलावंतांना शोधून त्यांची कला सार्थकी लावण्याचे काम आटपाडीच्या माळरानावर सुरु झाले आहे. ही खानच कसदार सोन्याची असल्यामुळे संधी मिळाल्यास कुठेही चमकत राहणारच. त्यासाठी या स्टुडिओचा चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. युनियनच्या वतीने या कलारत्नांना चांगल्या पद्धतीने न्याय देण्यासाठी समन्वयातून प्रयत्न करणार आहे.त्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी माध्यम उपलब्ध होत आहे.
निर्माते व दिग्दर्शक प्रा.सुरेश गायकवाड म्हणाले, माणदेश भूमी ही कलावंतांची खाण आहे. त्यात अनेक कलावंत हिरे लपलेले आहेत.त्यांना शोधून पैलू पाडणे आवश्यक आहे. यासाठी भारत कलावंत निर्माण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य सेवा करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या कलांची जोपासना करणाऱ्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आठवड्यातून दर रविवारी एका कलाकाराची कला सादर केली जाणार आहे.यामुळे कलावंतांना बळ मिळेल.
यावेळी नरेंद्र दीक्षित यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सचिन वाघमारे यांनी आभार मानले.कवी ज्ञानेश्वर डोंगरे यांनी कविता सादर केली.

चौकट
 प्रा. सुरेश गायकवाड यांनी सम्यक जीवन फिल्म्स अँड रेकॉर्डिंग स्टुडिओत "कलामल्हार" यूट्यूब चैनलसाठी तयार झालेल्या  शिर्षकगीताच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच लेखक, कवी ज्ञानेश्वर डोंगरे  यांनी ग्रामीण भागात निर्माण केलेल्या सम्यक जीवन फिल्म्स & म्युझीक रेकॉर्डिंग स्टुडिओसाठी कायम साथ राहील व पुढील उत्तरोत्तर प्रगती साठी शुभेच्छा दिल्या.