इंदापूर - वार्ताहर
●इंदापूरमध्ये एक महिला कोरोना पॉझिटिव्ह
● संपर्कातील एकवीस जणांची विलगीकरण कक्षात रवानगी
● उद्या इंदापूर शहरात पूर्ण दिवस जनता कर्फ्यू लागू
इंदापूर शहरातील कसबा पेठेतील दांपत्यापैकी अडोतीस वर्षांची महिला कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तिच्यासह संपर्कात आलेल्या एकवीस जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्या भागास भेट दिली आहे. परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. उद्या संपूर्ण शहरात पूर्ण दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी दवाखाना व खरेदीच्या निमित्ताने कसबा पेठेतील हे दांपत्य बाहेरगावी गेले होते. येथे आल्यानंतर गुरुवारी त्यांनी स्वेच्छेने उपजिल्हा रुग्णालयात आपली तपासणी करुन घेतली. स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.
काल त्यांचा रिपोर्ट आला. पतीची कोरोना चाचणी निगेटिव्ह तर पत्नीची पाॅझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकवीस जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. स्वॅबचे नमुने घेवून ते चाचणीकरीता पाठवण्यात आले आहेत.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कसबा भागात भेट दिली परिस्थितीची पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी, लोकांना मास्कचा वापर करा. सामाजिक अंतर पाळा. स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या. कोरोनाला घाबरुन जावू नका. कसली ही समस्या आल्यास प्रशासकीय अधिका-यांची भेट घ्या असे आवाहन केले.
पक्षनेते कैलास कदम यांनी सांगितले की, तारेच्या शाळेचा परिसर, जावडेकर शाळा परिसर, पोरापोरांच्या चावडीचा परिसर चौदा दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. उद्या संपूर्ण दिवस पूर्ण शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे अशी माहिती देवून परिसरात कोणाला कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्वीकृत नगरसेवक व त्या भागातील रहिवासी श्रीधर बाब्रस म्हणाले की, आमच्या भागात आज ज्या कुटुंबातील महिला कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले, त्या कुटुंबासह सर्व कुटुंबे कोरोनानियंत्रणासाठी आरोग्याची काळजी घेत आहेत. नियमांचे पालन करत आहेत.परगावी जावून आल्याने त्यांना बाधा झाली. कोरोनाचा शिरकाव झाला. ईश्वराच्या कृपेमुळे हे कुटुंबीय या संकटातून निश्चितपणे बाहेर येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, सकाळपासून तहसीलदार सोनाली मेटकरी, उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, नगराध्यक्ष अंकिता शहा, नगरपरिषदेतील सत्तारुढ गटाचे नेते कैलास कदम, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते नगरसेवक पोपट शिंदे, स्वीकृत नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी नगरसेवक धनंजय बाब्रस परिसरात ठाण मांडून आहेत. विषाणूनाशक औषधाची फवारणी सुरु आहे..

