मुख्यपृष्ठ व्यक्ती परिचय मनस्वी कलाकार -जॉनी लिवर..जीवन गाथा.
मनस्वी कलाकार -जॉनी लिवर..जीवन गाथा.
तो मुळचा हैदराबादचा, पक्का तेलगू ! दिसायला अत्यंत सामान्य, डोक्यावर कुरळ्या केसांचा डोंगर पण डोक्याने कुशाग्र बुद्धिचा .. असा एक तरुण, मुंबईतल्या "धारावी" (kings circle) या महावस्तीत राहात होता...त्याचे शिक्षण बेताचेच, पुढे शिकायचे तर जवल पैसे नाहीत त्यात वडील अट्टल तळीराम ! अशा वातावरणात हा मूलगा उद्या खुप मोठा होईल असा विचार कुणाच्याच लक्षात येणे केवळ अशक्य कोटीतली गोष्ट होती. ...पण मुंबई अशी एकच नगरी आहे की जिथे " रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव"! ..तर योगायोगाने या तरुणाचे आडनावही "राव", जॉनी
राव!
घरची पैशांची चणचण पडेल ते काम करायला भाग पाडत होते..तेही तो आंनदाने करत होता, मेहनतीला अंत नव्हता. पैसे मिळवुन घराला हातभार लावणे हेच ध्येय ! या कामाच्या व्यसनाला जोड होती सिनेमा बघण्याची ! ...यातील नायक नायिके पेक्षा त्याला आकर्षण होते त्यातील विनोदी नटांचे !
सुंदर, ओमप्रकाश, जॉनी वॉकर, केश्तो पासून थेट "मेहमुद" पर्यंत.
या सर्वांत त्याला मेहमुदने जास्त झपाटलं होते....मुळातच व्रात्य,खोडकर असल्याने तो चुंबकासारखा तिकडे खेचला गेला....त्या गजबजलेल्या महावस्तीत त्याला अनेक चित्रविचित्र लोकं बघायला, अनुभवायला मिळत होती....त्यांच्या विशिष्ठ लकबी, बोलण्याच्या पद्धती त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेल्या असायच्या....जोडीला "विनोद बुद्धि" ...जी फार कमी लोकांना वश असते..."चला आज विनोदी बोलूया, लिहूया" असे ठरवुन काही होत नसते ! त्यासाठी माणसाची वृत्ती मुळातच विनोदी असावी लागते...जी ह्याच्याकडे होती....अशी वृत्ती मग कारुण्यातही बोचरा विनोद शोधते. (ज्याला आपण black humour, black comedy असे म्हणतो)
तर त्या वेळेस हा रस्त्यांवर पेनं विकत असे...विक्री खास नसे. कसे ते माहीत नाही पण एक दिवस त्यांनी वेगवेगळ्या नटांच्या आवाजात पेन विकायला सुरवात केली.....लोकांना ही पद्धत नावीन्यपूर्ण वाटली....पेंनांच्या विक्री बरोबरच त्याचे हे मिमीक्रीचे तंत्र विकसित होत गेले..या विद्येत "गुरु" हा प्रकार नसतो, हे ज्याचे त्याने स्वयंप्रेरणेने, रियाजाने शिकायचे असते....दिवसेंदिवस तो यात माहीर होत गेला...रोज नवा आवाज त्याच्या पोतडीत जमा होवू लागला...तसा तो त्या विभागात प्रसिध्द होत गेला...मग अल्पशा बिदागीवर पण ब-याच वेळा फुकट तो गणपती उत्सव यासारख्या तत्सम ठिकाणी कार्यक्रम करू लागला...आणि इथे त्याला प्रेक्षकांची नस कळू लागली...पुढे अकुशल कामगार म्हणून तो "हिंदुस्थान लिवर" मधे रुजू झाला होता, त्याच्या गमत्या स्वभावाने तिकडेही तो सर्वांचा लाडका बनला....अशातच त्याला एका ऑर्केस्ट्रात संधी मिळाली..षणमुखान्ंद मधे त्याचा पहिला वहिला परफॉर्मन्स तुफान हिट गेला...तिन हजार प्रेक्षकांना एकट्याने अर्धा तास खिळवुन ठेवण्यात त्याला यश आले.
आणी इथूनच "जॉनी राव ---- जॉनी लिवर" बनला. लिवर असे नामकरण करन त्याने ह्या कंपनीचे "ऋण" आपल्या बरोबर अबाधित ठेवले.
इथूनच जॉनीभाईच्या गाडीने स्पीड घेतला....त्या काळात त्याच्या एवढा व्यस्त दुसरा मिमीक आर्टीस्ट कुणीच नव्हता...आता देशी विदेशी तो कार्यक्रम करत होता...त्याच्या जादूई पोतडीतले अस्सल आवाज आणि स्वत: तयार केलेले विनोद, गोष्टी त्याच्या लोकप्रियतेत रोज भर टाकत होत्या.....आता नियतीने त्यांच्या पदरात यशाचे अजुन मोठे माप टाकताना त्यांना चित्रपटाचे नवे दालन खुले करुन दिले.. "जलवा"
हा सिनेमा पदार्पणातच तुफान चालला...अन जॉनीभाईंची मागणी प्रचंड वाढली...सर्व चित्रप टात त्यांचे दर्शन घडत असे..आता तर क्षणाची फुरसत नव्हती....जॉनीभाई आता सुपरस्टार कॉमेडीयन झाले होते.
ब-याच वेळी चित्रपटात त्यांच्या रोलसाठी सीन लिहायची पंचाईत पडे तेव्हा ते स्वत: सीन डेव्हलप करत असत. "लव के लिये कुछभी करेगा" सारखा फालतू चित्रपट जॉनीभाईंच्या "अस्लम भाई" या व्यक्तीरेखेने चांगला चालवला...अशी खुप ऊदारहणे देता येतील....इतर समकालीन कॉमेडीयन्स कडे नसलेले नृत्याचे
अंग त्यांच्या भात्यातले ब्रम्हास्त्र बनले....आठवून बघा !
मिमीक आर्टिस्ट ते सिनेमातील सुपरस्टार कॉमेडीयन असा दिमाखदार प्रवास करणारा पहीला आणि कदाचित शेवटचा कलाकार म्हणजे जॉनीभाई !
ह्या माणसाने हलाखीची परीस्थीती जवळुन बघितल्याने ह्यांना बेगडी श्रीमंतीचे कूबड कधी आले नाही. ब-याचवेळा माणसे अपयशापेक्षा, यशानेच मुर्दाड बनतात पण जॉनीभाई इथे अपवाद ठरतात.
आजही तो त्याच्या काळातल्या इतर मिमीक आर्टिस्ट या सर्वांना धरन आहे...आमचा गजाकाकाला (गजानन नार्वेकर) ते नेहमी फोन करुन ख्यालीखुशाली जाणून घेतात...अनेकांना आर्थिक मदत गाजावाजा न करता देत असतात....तेव्हा अशा माणसाची नी माझी गाठ अचानक झाली.
"शिवाजी मंदीर" येथे माझ्या नाटकाचा पन्नासावा प्रयोग होता (खाली तसा फोटो दिला आहे).
नाटक सिनेमेटीक असल्याने पडदयावर माझ्या पोलिस पाठलागाची दृश्य नामावली बरोबरच दाखवली जात असत...ते संपल्यावर मी सेटवर एका घरात दाखल होतो...प्रवेश संपल्यावर तिनचार मिनिटात मला मेकअप, गेटअप बदलून लगेच दुसरा प्रवेश असे...घाई होत असे...त्या दिवशी मी चेंजओवर साठी धावत ग्रीन रूम मधे निर्माते देसाई चक्क जॉनीभाईं बरोबर बसले होते...माझी गडबड बघून त्यांच्या
लक्षात आली नी ते चटकन उभे राहुन मला जागा मोकळी करून दिली. ..तेव्हा "सर , प्लिज आप बैठीये ना" असे मी म्हणताच....."सॉरी, आपको देरी हो जायेगी..मै तो यहां मेहमान हूँ". असे म्हणत माझा चेंज बघत होते....मी लगेच प्रवेशासाठी निघुन गेलो....एवढ्या
मोठ्या कलाकाराचा विनय बघून मी स्तंभितच झालो होतो.
मध्यंतरातील कार्यक्रमात स्टेजवर
त्यांच्या बरोबर इतरही सेलिब्रेटिज होत्या...प्रदीप पटवर्धन, ज्युनियर मेहमुद होते. नाटक संपल्यावर त्यांनी सहज बाजूला घेऊन म्हणाले " हमारे फिल्म इंडस्ट्रीमे तो लोग मेकअप,गेटअपके लिये कई लोग दोदो घंटे लगाते है...आप तो चार मिनिटमे बनके चले गये" असे बोलून खळखळून
हसले.. मी लगेचच त्यांना म्हणालो "सर, ये कुछभी नही, बहोसे ड्रामामे इससेभी फास्ट चेंजओवर होते है" त्यावर त्यांनी "ऐसा क्या?" म्हणत जो चेहरा केला तो आजही माझ्या नजरेसमोर आहे.
वास्तविक हा प्रसंग खुप छोटा पण जॉनीभाईंच्या वागण्याने मोठा ठरला..म्हणूनच तो आजही माझ्या स्मरणात आहे.
फळाफुलांनी डवरलेले झाड नेहमी वाकलेलेच असते हे सत्य जॉनीभाईंच्या वागण्याने पुन्हा एकदा सिध्द केले.
We all love you Johnnybhai.
© ®
Rajendra Kulkrni.
डोंबिवली.