अंभेरीतील कोरोनाबाधितांची वाढती साखळी तोडण्याचे प्रशासनासमोर आव्हान; औंध भागातील अनेक गावे झाली हायअलर्ट



औंध(वार्ताहर):- वरची अंभेरी ता.खटाव येथे शुक्रवारी पाच कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण सापडल्याने चौकीचा आंबा,औंध परिसराला मोठा दणका बसला असून यामुळे अनेक गावे हायअलर्ट झाली आहेत. दरम्यान अंभेरीतच एकूण सहा कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण सापडल्याने व त्यातील एकाचा दोन दिवसापूर्वी मूत्यु झाल्याने प्रशासनासमोर आता कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्याचे आव्हान उभे राहिले आहे. शुक्रवारी रात्रीपासून प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून अंभेरी गावाची नाकाबंदी अधिक कडक करून कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी काही जणांना पुसेगाव येथे हलविण्यात आले आहे.  सुरूवातीला खटाव तालुक्यातीलऔंध परिसरातील खरशिंगे येथे  पहिला कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

मागील मंगळवारी वरची अंभेरी गावात पहिला पाँझिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर चौकीचा आंबा परिसर ढवळून निघाला होता. यावेळी संबंधित रुग्णासह अन्य तीन जणांना सातारा येथे हलविण्यात आले होते मात्र 53वर्षीय कोरोना पाँझिटीव्ह रुग्णाचा मूत्यु झाला त्याचबरोबर अन्य तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही अन्य एका निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीचेही निधन झाल्याने अंभेरीमध्ये नेमके पुढे काय घडणार याचीच चर्चा सर्वत्र सुरू होती व धास्ती ही निर्माण झाली होती

त्यावेळी एकूण बावीस जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामध्ये नऊ जण हायरिस्क संपर्कातील होते. त्यामधील चौघे व गावातील एक असे स्वँब घेतलेले एकूण पाच रुग्ण शुक्रवारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा गावातील एका कोरोनाबाधित व्यक्तिसह अन्य तिघांंना हलविण्यात आले आहे.

दरम्यान पाच मे नंतर सुमारे 64लोक अंभेरी येथे आले आहेत. त्यामुळे क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या व्यक्तीसह अन्य प्रवासी व्यक्तिंवर ही प्रशासन लक्ष ठेऊन आहे
दरम्यान अंभेरी येथे शनिवारपासून पुन्हा औषध फवारणी केली जात असून नागरिकांची आरोग्य तपासणी  व सर्व्हे ही सुरू आहे.
      ▬▬▬▬▬▬▬▬▬
चौकट... अंभेरीमुळे औंध परिसरात भितीचे वातावरण

खरशिंगेनंतर  अंंभेरी  येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत मात्र त्याठिकाणी रुग्णांची संख्या वाढू लागल्याने याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती साखळी तुटणार का याकडेच सर्वाचे लक्ष आहे. त्यामुळे औंध ,चौकीचा आंबा परिसरातील अनेक गावांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अंभेरी येथील रुग्णांच्या संपर्कात औंध भागातील कोण कोण आले होते याचीही माहिती घेऊन अशा व्यक्तिंना त्या त्या गावात क्वारटाईन केले आहे अशी ही माहिती प्राप्त झाली आहे.
     ▬▬▬▬▬▬▬▬▬