माण तालुक्यातील मेंढपाळ व्यावसायिक, ऊसतोड मजूर,स्थलांतर सुरु
बिदाल : आकाश दडस
नुकतीच दिवाळी संपली अन् माण तालुक्यातील स्थलांतराने वेग घेतला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी माण तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात धंदा अथवा व्यवसायानिमित्त तालुक्याबाहेर भिन्न ठिकाणी स्थलांतरित होताना दिसत आहे. मेंढपाळ, ऊसतोड कामगार, रंगकाम करणारे गाव सोडू लागले आहेत .यावर्षी पावसाने माण तालुक्याकडे पाठ फिरवल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच माणमधील अनेक गावांमधून तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली असून माणसांना व जनावरांना प्यायला पाणी नाही त्यातच चाराटंचाई झाल्याने अनेकांनी स्थलांतर सुरु केले आहे.
माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेळ्या व मेंढ्या पालन करणारा धनगर समाज आहे. साधारणपणे दिवाळीनंतर यातील अनेकजण आपले शेळ्या मेंढ्यांचे कळप घेऊन कराड, वाई, पाटण,भुईज, पाली, कोरेगाव सातारा आदी भागात जात असतात. यावर्षी मात्र पाणी व चाराटंचाई लवकरच जाणवू लागल्याने स्थलांतरही लवकर सुरू झाले आहे.
अनेकांच्या मुलामुलींची लग्ने दिवाळीपूर्वी लावून मगच निघायचे असे असताना केवळ पाणी व चार्या अभावी लग्नाचे कार्यक्रम पुढे ढकलून शेळ्यामेंढ्यांबरोबरच इतर जनावरेही टेंपो, ट्रकमध्ये भरून इच्छित स्थळी घेऊन जात आहेत. घरी फक्त वयस्कर मंडळी मागे ठेवली जात असून काहींनी आपली मुले अगोदरच आसपासच्या आश्रमशाळांमधून पाठवली आहेत तर काहींनी मुलांच्या शिक्षणाचा विचार न करता त्यांना आपल्याबरोबरच घेऊन जाण्यात धन्यता मानली आहे. तालुक्यातील काही शेतकरी कडबा, वाळलेली मका, पाण्याअभावी सुकलेला ऊस विकत आणून जनावरे जगवत आहेत. त्यातच कडब्याचा वाढलेला दर विचारात घेता अनेकांना ही वैरण घेणेही परवडत नाही. त्यामुळे त्यांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्यावर्षापासून माणमध्ये ब-याच मोठ्या प्रमाणावर शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय वाढला होता, पण लगेच दुष्काळ पडल्याने महागाईने आणलेल्या संकरित गाई कवडीमोल दराने विकाव्या लागत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय कोलमडणार अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. सातारा, कर्हाड, पाटण, बारामती, पुणे,सोलापूर, सांगली,फलटण सारख्या तालुक्यात एम. आय. डी. सी च्या रूपाने अनेक उद्योग धंदे असल्याने तेथे रोजगार थोड्याफार प्रमाणात का होईना उपलब्ध होत असतो. मात्र, माणमध्ये अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने सर्वसामान्यांना स्थलांतराशिवाय गत्यंतरच उरले नाही.
माण तालुक्यातील खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली, तर उशिरा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे रब्बीची पिके हाती लागण्याची शक्यता कमी आहे. कांदा पिकामुळे काही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले; मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी घालावे लागले. दुसऱ्या बाजूला दराच्या पडझडीमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा पिकाने अक्षरश: रडविले. अशा विचित्र अवस्थेत दिवाळीचा सण बहुतांशी माणवासीय जनतेने ओढून-ताणून साजरा केला.
दिवाळी झाली अन् माणवासीय जनता आपापल्या सोयीने पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतराच्या तयारीत आहेत. काहीजण स्थलांतराच्या मार्गावर, तर अनेकजण व्यवसाय अथवा धंद्याच्या ठिकाणी पोहोचलेही आहेत. ऊसतोडणी, मेंढपाळ, व्यवसाय व मुंबई, वसई येथेल मातीकाम, रंगकाम हे येथील जनतेचे हक्काचे.
पोटापाण्याचे व्यवसाय मेंढपाळ, शेळ्या-मेंढ्यांसह लातूर, बार्शी तसेच मराठवाड्यातील अनेक गावी जातात. जून महिन्यात पाऊस झाल्यानंतरही जनता परत आपल्या गावी येते. या कालावधीत मेंढपाळ करणाऱ्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. प्रसंगी नुकसान ही सोसावे लागते. आपले पशुधन वाचविण्यासाठी येथील जनता
गाव व आपले शिवार सोडून
परप्रांतात जातात, ही वस्तुस्थिती
आहे.
ऊसतोडणीसाठी तर माण तालुक्यातील अनेक लोक कुटुंबासह सहा महिने बागायत क्षेत्रात स्थलांतरित होतात. म्हातारी माणसं घर राखण्यासाठी लहान मुलासह गावी राहतात. तर काही लहान मुले, शाळेला दांडी मारून आईबाबासोबत ऊसतोडीला जातात. वळई, बिदळी, पर्यंती, ढाकणी, जांभुळवाडी, कुरणेवाडी, वरकुटे, पानवन,
दिवड, पळशी, धामणीसह अनेक गावांतील जनता ऊसतोडणीसाठी वारणा, सह्याद्री, वाळवा
तसेच सांगली भागात स्थलांतरित होतात.
पोटासाठीव प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी माणदेशी जनता नोव्हेंबर ते मे महिन्याअखेर इतर प्रांतात स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे. माण तालुक्याच्या स्थलांतराला थोपविण्यासाठी येथील जनतेला आपल्या गावात उद्योग व्यवसाय मिळविण्यासाठी माण तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविणे हा एकमेव उपाय आहे. भविष्यात त्यादृष्टीने उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे. फोटो ओळी :माण तालुक्यातील लोक स्थलांतर होताना .