मु.स.पं. अभियानांतर्गत विभागस्तरीय मूल्यमापनासाठी दि:२२ जुलै रोजी समिती कावडीत.

 मु.स.पं. अभियानांतर्गत विभागस्तरीय मूल्यमापनासाठी दि:२२ जुलै रोजी समिती  कावडीत.

(अजित जगताप) 

करहर दि: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती मार्फत सातारा जिल्ह्यातील तालुकास्तरावरील  प्रथम दोन ग्रामपंचायत चे मूल्यमापन केले जाणार आहे. बुधवार दिनांक २२ जुलै रोजी कावडी ता. जावळी व मान्याची वाडी ता. पाटण या ग्रामपंचायतीची निवड केली आहे.यापूर्वी समितीने सातारा जिल्हयातील २२  ग्रामपंचायतींचे  मूल्यमापन केले आहे.  

सदर मूल्यमापन प्रक्रियेनंतर सर्वाधिक गुण प्राप्त  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुणे विभागस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारासाठी होणाऱ्या मूल्यमापनासाठी निवड करण्यात आली आहे.

पुणे विभागातील जिल्हा परिषदांचे मूल्यमापन करण्यासाठी श्री.विजय मुळीक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय मूल्यमापन समिती गठीत करण्यात आली असून, सदर समितीमार्फत बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सातारा जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील निवड झालेल्या दोन ग्रामपंचायतींचे विभागस्तरीय मूल्यमापन करण्यात येणार आहे.

         या मूल्यमापनामध्ये ग्रामपंचायतींची अभियानातील निकषांच्या अनुषंगाने सविस्तर पडताळणी होणार आहे.

त्या अनुषंगाने, गट विकास अधिकारी, पंचायत समिती पाटण, जावली यांनी आपल्या तालुक्यातील मूल्यमापन सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पुर्वतयारी करावी तसेच मूल्यमापन समितीला आवश्यक असणारे अभियान विषयक सर्व अभिलेखे, कागदपत्रे व प्रत्यक्ष केलेल्या कामांची तयारी संबंधित ग्रामपंचायतींमार्फत पूर्ण ठेवावी आणि अभियानातील समाविष्ट घटकांच्या अनुषंगाने सर्व विभागांचे खाते प्रमुख यांचेसह अभियान विषयक कामकाज पाहणारे सर्व संबंधित यांनी तपासणी दिवशी उपस्थित राहून आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

     

 सातारा जिल्हा परिषद, सातारा यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका स्तरावरील सर्व खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.), प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हास्तरीय सर्व खातेप्रमुख, अभियान जिल्हा कक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष अभिनंदन केले आहे.

                      विभागस्तरीय मूल्यमापनात सातारा जिल्हयातील मान्याचीवाडी आणि कावडी या ग्रामपंचायती यशस्वी होऊन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड व्हावी. यासाठी जिल्हा परिषद सातारा मार्फत शुभेच्छा देण्यात आल्या. सातारा जिल्हा परिषद सदस्य व कावडी गावचे सुपुत्र श्री वसंतराव मानकुमरे, ॲड.बापूसाहेब 

मानकुमरे व कावडी ग्रामस्थांनी खूप मोठे परिश्रम घेतलेले आहेत. कावडी तालुका जावळी ग्रामपंचायतच्या मालकीचे उपहारगृह असलेले महाराष्ट्रातील पहिले ग्रामपंचायत म्हणून कावडीचा नावलौकिक संपूर्ण राज्यात पसरला आहे. या बहुमूल्य कामगिरीबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन व उद्योजक हनुमंत रांजणे, अँड . विलास वहागावकर जावळी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

फोटो-- जावळी तालुक्याचे नावलौकिक करणारी कावडी ग्रामपंचायत.. (छाया- अजित जगताप करहर)
---------------------------------------------------