कमवा व शिका योजनेत साताऱ्यात बैलाविना बेंदूर साजरा


(अजित जगताप) 

सातारा दि:  ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा सहकारी म्हणून बैल हा खऱ्या अर्थाने सारखी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बेंदूर सण साजरा होत आहे. अजूनही यंत्रसामग्रीमुळे ग्रामीण भागात बैलांची संख्या घटली आहे तरीही बेंदूर साजरा होतो. साताऱ्यातील कमवा व शिका योजनेतून बैला विना शेती होत आहे. तरीही बेंदूर मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला. 

         रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बैल नसला तरी गाईचे पूजन करून बेंदूर साजरा करण्याचे भाग्य लाभले आहे. अनेक विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शेतात राबून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. एवढेच नव्हे तर या ठिकाणी शेतीतून निघणारे उत्पनामुळे खऱ्या अर्थाने कमवा व शिका हा संदेश सर्व दूर पसरला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने रयत शिक्षण संस्थेमध्ये विधायक उपक्रम राबवले जातात. या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन मोठ्या उच्च पदावर कार्यरत असणारे विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

     ग्रामीण संस्कृतीमध्ये बेंदूर म्हटला की, डोळ्यासमोर उभे राहतात सजवलेले सर्जा-राजा जोड गोळी, रंगीबेरंगी शिंगे, ढोल-ताशांच्या गजरात बैलगाडीतून निघणारी मिरवणूक आजही अनेकांच्या आठवणीच्या तिजोरीत बंदिस्त आहे.   पण काळाच्या ओघात ही परंपरा अनेक ठिकाणी लोप पावत चाललेली आहे. शहरी भागात बाजारातून विकत आणलेल्या मातीच्या बैलाचे तेवढ्याच प्रेमाने पूजन सुद्धा केले जाते. त्याच भावनेची प्रचिती यंदा रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील 'कमवा व शिका' योजनेत आली आहे.

रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'कमवा व शिका' योजनेअंतर्गत विद्यार्थी शेती करत आहेत. त्या शेतीचे खरे साथीदार होते . बेंदूर सणानिमित्त बैलजोडीची मिरवणूक निघत होती पण दुर्दैवाने २०१९ मध्ये या बैलजोडीची शेवटची बेंदूर मिरवणूक निघाली. त्यानंतर मात्र गोठ्यातील बैल कायमचे आईच्या रुमाला सारखे हरवून गेले आहेत.

यंदा बेंदूर आला, पण सर्जा-राजा नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या. परंपरा खंडित होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी गोठ्यातील गाई महाविद्यालयाच्या परिसरात आणून त्याचे मनोभावे पूजा केली. त्यांना निवेद भरवला. बैल नसले तरी कृषी संस्कृतीप्रती असलेला आदर जिवंत ठेवला.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, 'कमवा व शिका' योजनेचे चेअरमन डॉ. रामराजे माने-देशमुख, रेक्टर वराडे पाटील, प्रा. संदीप भुजबळ, परदेशी मामा तसेच 'कमवा व शिका' योजनेतील विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान पूर्वी ग्रामीण भागामध्ये किमान गाव पातळीवर गावातील पंचवीस ते शंभर बैलजोडींची भव्य मिरवणूक दृष्टीस पडत होती. आता त्याच्या जागी आता ट्रॅक्टर व काही नर्तिकेंनी घेतलेली आहे. कमवा व शिका योजने ऐवजी आता राजकारणात कमवायला शिका असा संदेश नेते देऊ लागलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने बेंदूर सणाच्या ठिकाणी धांगडधिंगा व मनोरंजनाचेच कार्यक्रम ऐकण्यास व पाहण्यास मिळत असल्याची टीका होऊ लागली आहे. त्यामानाने छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने बेंदूर सण बैलाविना पण संस्कृतीला धरून केल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.


--------------------------------------------------


फोटो -कमवा  व  शिका  योजनेचे प्राचार्य

  डॉ. राजेंद्र मोरे,  चेअरमन डॉ. रामराजे माने- देशमुख, रेक्टर वराडे पाटील, प्रा. संदीप भुजबळ, परदेशी मामा व विद्यार्थी (छाया- अजित जगताप सातारा)