जळकोट मतदारसंघातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या;



 मंत्रालयातील बैठकीत जास्तीत जास्त नुकसान भरपाईची मागणी

(अतनुर,ता.जळकोट)

लातूर जिल्ह्यातील व उदगीर- जळकोट मतदारसंघातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; 

मंत्रालयातील बैठकीत जास्तीत जास्त नुकसान भरपाईची मागणी

लातूर जिल्ह्यातील व उदगीर-जळकोट मतदारसंघातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज मंत्रालयात राज्याचे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान, जमीन खरडून झालेली हानी तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे यांनी लातूर जिल्ह्यातील व उदगीर-जळकोट मतदारसंघातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून त्यांना तातडीने व जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे ठोस मागणी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आ. संजय बनसोडे यांनीही शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

बैठकीत मांडण्यात आलेल्या माहितीनुसार, खरीप २०२५ हंगामात उदगीर-जळकोट मतदारसंघातील जवळपास ८५ ते ९० टक्के पीक क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे. उदगीर तालुक्यात ६१ हजार ८४५ हेक्टर तर जळकोट तालुक्यात ३० हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. एकूण ९२ हजार ७१२ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ७७ हजार ८६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सुमारे ६८९८.३६ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी बैठकीत विविध महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. एनडीआरएफ पंचनाम्यांची माहिती ग्राह्य धरून सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा मंजूर करावा, अतिवृष्टीमुळे पिकांच्या गुणवत्तेत झालेल्या घटीचाही विमा योजनेत समावेश करावा तसेच ई-पीक पाहणीतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी तातडीची दुरुस्ती व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना बैठकीत मांडण्यात आल्या.

याशिवाय गाव पातळीवर पंचनामे करण्याची व्यवस्था, पीक कापणी प्रयोगांची संख्या वाढवणे, विमा कंपन्यांवर कडक नियंत्रण ठेवणे, शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याची तरतूद करणे तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासनाने उचलावा, अशा विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. 


माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी, लातूर जिल्ह्यातील व उदगीर-जळकोट मतदारसंघातील शेतकरी नैसर्गिक संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना न्याय देत तातडीने आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी भूमिका मांडली, शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी हि केली.

विमा कंपनीने जिल्हास्तर व राज्यस्तरावर अपिल केले होते ते दोन्ही स्तरावर फेटाळण्यात आले आहेत. त्याप्रमाणे विमा कंपनीने मान्यता दिली असुन आता विमा कंपनी विमा भरपाई देण्याची कार्यवाही तातडीने करणार असल्याचे विमा कंपनि प्रतिनिधी श्री चंदन जगताप यांनी बैठकीत सांगितले. माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी विमा प्रतिनिधी यांना लातूर जिल्ह्यातील व उदगीर जळकोट मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा देण्याची कार्यवाही करण्याची सूचना केली.



बैठकीस कृषि सचिव श्री परिमल सिंह, कृषि आयुक्त श्री सुरज मांढरे, श्री. ज्ञानेश्वर बिरादार, सभापती, जिल्हा परिषद, लातूर, डॉ. दीपक सोमवंशी, जिल्हा परिषद सदस्य, लातूर, श्री. रामराव राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री. प्रकाश राठोड, पंचायत समिती सदस्य, उदगीर, श्री. बालाजी भोसले, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, उदगीर, लातूर जिल्हा कृषी अधिकारी श्री राजेंद्र कदम इत्यादी जण उपस्थित होते