जवळगा बेट येथील प्राची मुकडे दहावी CBSE परीक्षेत धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक

(प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते  सत्कार )


(मुरुम प्रतिनिधी) 

तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथील जवळगा बेट गावातील प्राची मुकडे हिने दहावीच्या CBSE परीक्षेत ९९.२०% (४९६/५००) गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे गावकऱ्यांच्या वतीने तिचा व तिच्या वडिलांचा प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.प्राचीच्या यशामागे तिची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध जीवनशैली आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. तसेच तिच्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार व प्रोत्साहनही तिच्या यशाला कारणीभूत ठरले आहे. ग्रामीण भागातून येऊनही तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केल्याने ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. प्राची मुकडे ही माजी सरपंच रामानंद मुकडे यांची सुपुत्री असून, तीच्या यशामुळे लोटस पोदार लर्न स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचीही प्रचिती आली आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. सत्काराला उत्तर देताना प्राची मुकडे हिने आपण ग्रामीण भागातील असूनही मोठे यश संपादन करता येते, यावर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोणतीही न्यूनगंडाची भावना मनात बाळगता कामा नये, असे ती म्हणाली. जिद्द, चिकाटी, नियमित अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश तिने दिला.