पुणे:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरची आगामी राजकीय दिशा आणि पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी आम आदमी पार्टीची (आप) महत्त्वाची राज्यस्तरीय आढावा व नियोजन बैठक नुकतीच पुण्यात संपन्न झाली.
पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा. श्री. प्रकाश जरवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी आगामी काळात महाराष्ट्र हे बदलाच्या राजकारणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रदेश निवडणूक प्रचार प्रमुख रंगा राचुरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वसंतराव ढोके, प्रदेश राजकीय समन्वयक अमित म्हस्के यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा व शहर अध्यक्ष आणि निवडणुका लढवलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना सातारा जिल्हा उपाध्यक्ष सोहम शिर्के यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रात राजकीय द्वेषातून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीत प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी पक्षाने 'वकिलांची मोठी फौज' उभी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी मांडली.
सोहम शिर्के यांनी यावेळी ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणाऱ्या SBDB (SBDB Rural & Urban Connecting) या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. माण-खटाव तालुक्यापासून या प्रकल्पाची सुरुवात होत असून, याद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, महिला सशक्तीकरण आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. व्यापारी वर्गालाही यामुळे मोठी संधी मिळणार असून, या उपक्रमाचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आणि 'आप'च्या कार्यकर्त्यांना होईल, अशी घोषणा त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश जरवाल यांनी कार्यकर्त्यांना बळ देताना सांगितले की, "महाराष्ट्र राज्य हे पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, लवकरच दिल्लीतील प्रमुख नेते संपूर्ण राज्यात सभा आणि दौरे करणार आहेत." विशेषतः माण-खटावसह सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीमुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात पक्ष विस्तार जोमाने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
