विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ते मोबाईलचा प्रभाव या विषयावर चर्चा

 *श्री शिवाजी महाविद्यालयात ग्रामीण वास्तवावर खुल्या गटचर्चेतून मंथन* 

बार्शी : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित खुल्या गटचर्चेत बालविवाह, हुंडाबळी, महिलांचा राजकारणातील सहभाग, मोबाईलचा वाढता प्रभाव, युवकांमधील व्यसनाधीनता, कोविडनंतरच्या शिक्षणातील बदल तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. श्री शिवाजी महाविद्यालयातील कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या

या गटचर्चेचे प्रमुख व्याख्याते प्रा. वैभव कुलकर्णी होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राहुल पालके होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले, ग्रामीण भागात अजूनही बालविवाह व हुंडाबळी सारख्या सामाजिक समस्यांचे अस्तित्व चिंताजनक असल्याचे सांगितले. तसेच मोबाईलच्या अति वापरामुळे युवकांमध्ये मानसिक ताण, एकटेपणा आणि व्यसनाधीनता वाढत आहे. युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोविडनंतर शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल झाले असून ऑनलाईन शिक्षणाच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयींमध्येही बदल झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वर्गातील अनुपस्थिती वाढत असल्याची बाब चर्चेत मांडण्यात आली. विद्यार्थ्यांनी नियमितपणे वर्गात उपस्थित राहून शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज वक्त्यांनी अधोरेखित केली.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. राहुल पालके यांनी ग्रामीण


भागातील सामाजिक प्रश्नांवर सातत्याने संवाद आणि जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षण, समाजजागृती आणि सकारात्मक संवाद यांच्या माध्यमातून अशा समस्यांवर मात करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

या चर्चासत्रात उपस्थितांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमामुळे ग्रामीण स्तरावरील अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फुटल्याचे मत व्यक्त करण्यात आले.