रिक्षांच्या क्युआर कोड ने महिला व युवतींना अभय...

  (वडूज पोलीस ठाण्यामध्ये रिक्षांना क्युआर कोड चिटकविताना शालेय विद्यार्थीनी सोबत पोलीस अधिकारी व कर्मचारी वृंद-छाया विनोद लोहार)



* वडूज मध्ये  पोलिस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम 
वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार
वडूज : येथील उपविभागीय पोलिस कार्यालय व वडूज पोलिस ठाणे अंतर्गत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलाकडून प्रवासी रिक्षांना क्युआर कोड बसविण्यात आले . यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे , पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांच्या सोबत हुतात्मा परशुराम विद्यालयातील व छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थींनी उपस्थित होत्या . 
              वडूज व दहिवडी येथील शेकडो रिक्षावर क्युआर कोड शालेय विद्यार्थीनींच्या हस्ते चिटकविण्यात आले . याप्रसंगी सपोनी अमित शिंदे , विक्रांंत पाटील वाहतुक नियंत्रण शाखेचे  पोलिस अजय भोसले , एस. व्ही. लोखंडे , गजानन वाघमारे, एस . सी . साबळे , पोलीस हवालदार गणेश शिरकोळे , शिवाजी खाडे आदिसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते . याप्रसंगी वडूज व दहिवडी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी , सदस्य , चालक - मालक   मोठ्या संख्येने उपस्थित होते . महिला व मुलींसह एकूणच सर्व प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा पोलीस दलाने प्रत्येक रिक्षावर क्युआर कोड बसविण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार शहरासह इतर गावातील रिक्षांचा सर्व्हे करण्याच्या सुचना पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिल्या होत्या .वाहतुक नियंत्रण शाखेच्या अजय भोसले , गजानन वाघमारे यांच्यासह वाहतुक कर्मचार्‍यांनी सातत्याने रिक्षांची तपासणी करत रिक्षा चालकांकडून त्यांची सर्व माहिती असणारे अर्ज भरून घेतले . यामध्ये रिक्षा चालकाचे नाव , रिक्षाचा नंबर , चेसीस नंबर , चालकाचा फोटो , रिक्षा कोणत्या थांब्यावर असते . चालक व मालकाचा मोबाईल नंबर व इमेल आयडी यासह सर्व माहिती घेण्यात आली . 
                        ही माहिती संकलन करून पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली . याचा डेटा एकत्र करून ऑनलाईन माहिती भरण्यात आली . याद्वारे आता कोणत्याही रिक्षावर लावलेल्या क्युआर कोड वरून त्या रिक्षाची माहिती अगदी सहज प्रवाशांना समजणार आहे .