स्वतःच्या मुलीचा खुन केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप व रु.5 हजार दंडाची शिक्षा

स्वतःच्या मुलीचा खुन केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप व रु.5 हजार दंडाची शिक्षा

औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे 
.           ( आरोपी शंकर शिंदे..)
लग्नासाठी आणलेली स्थळे मुलगी पसंत करत नाही म्हणून मुलगी झोपेत असताना बापाने रागाने तिच्या डोक्यात लाकडी दांडके व लोखंडी अँगल मारून खून केला होता. या प्रकरणात आरोपी शंकर बजरंग शिंदे (रा. औंध) या 78 वर्षे वयाच्या वृद्धास जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
आरोपीने 19 फेब्रुवारी 2012ला पहाटे साडे पाचच्या दरम्यान मुलगी झोपेत असताना तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने व लोखंडी अँगलने मारहाण करून गंभीर जखमी करून तिचा खून करून स्वत:पोलीस ठाण्यात येऊन खबर दिली होती. याप्रकरणी औंध पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर गुन्हाचा तपास सपोनि सी.आर.शिर्के यांनी केला होता.त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले व पुर्ण तपास करुन आरोपीविरुध्द मा.जिल्हा न्यायालय, वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.वडूज येथील मा.जिल्हा सत्र न्यायालयात याकामी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव हरीष काटकर यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये 11साक्षीदार सरकार पक्षाच्यावतीने तपासण्यात आले होते. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैदयकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मा.अति.जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे,सपोनि चिमणाजी केंद्रे यांनी तसेच प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, अमीर शिकलगार, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.