इंदापूर : प्रतिनिधी -
निरा भिमा सहकारी साखर कारखाना पुढील काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. तसेच दूधगंगा दूध उत्पादक संघाने अमूल या दूध उत्पादक संस्थेशी करार केला असून या संघाच्या माध्यमातून दूध संकलन सुरु केले आहे. संघ शेतकऱ्यांच्या दूधाला चांगला दरही देत असल्याने यापुढील काळामध्ये तालुक्यातील शेतकर्यांना चांगले दिवस येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुपर शॉपिंग सेंटरच्या भूमिपूजनप्रसंगी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले उपस्थित होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून लाखेवाडी गावाचे सुपुत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव दिलीपराव ढोले यांच्या प्रयत्नातून विकासकामासाठी निधी उपलब्ध झाला असून या शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून गावातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून गावामध्ये आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत अशी अनेक विकासकामं पूर्ण होऊन गाव स्मार्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, गावातील तरुणांना शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. तसेच भवानीमाता मंदिराच्या विकासासाठी भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही निधी उपलब्ध करून असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव दिलीपराव ढोले यांनी लाखेवाडी गावातील विकास कामांना निधी उपलब्ध करून दिल्याने श्री. पाटील यांनी त्यांचे आभार मानले.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, देशांमध्ये कोरोनाचे महाभयंकर संकट निर्माण झाले असून आपल्या इंदापूर तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेऊन घरीच थांबावे व सरक्षित रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी तालुक्यातील नागरिकांना केले.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीच्या विशेष निमंत्रित
सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी उदयसिंह पाटील,महादेव घाडगे, सरपंच सोमनाथ गायकवाड,उपसरपंच सदाशिव बागल,तंटामुक्तीचे अध्यक्ष तुकाराम साबळे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
चौकट : राज्यामध्ये पुन्हा भाजपचे सरकार.....
" सध्या राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार असून प्रत्येक पक्षाची विचारधारा ही वेगळी असून त्यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. आज आपण सरकारमध्ये नसलो तरी आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्याच्या सरकारचे काय चाललेले आहे.हे सर्वांना माहिती आहे. ही सर्व परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेश कार्यकारणीचे विशेष निमंत्रित
सदस्य हर्षवर्धन पाटील यांनी दिला".