राजगृह तोडफोडीचा सर्वस्तरातून निषेध




इंदापूर : प्रतिनिधी (दि. ८ जुलै )
     
      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर,मुंबई येथील निवासस्थान असलेल्या "राजगृह"ची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याच्या घटनेचा इंदापूर तालुक्यातून तीव्र निषेध होत आहे.
 
      राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. दोषींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
 
     राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या पवित्र वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक आहे,अशी प्रतिक्रिया व्यक्त करत हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध केला आहे.
 
      इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे व बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण यांनी महामानवाच्या वास्तुत जावून धुडगूस घालण्याचे धाडस करणारी ही प्रवृत्ती दि.१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची तर आठवण करुन देत नाही ना असा सवाल उपस्थित करत, देशात व राज्यात अशांतता निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहेत हे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे, असे मत व्यक्त केले आहे.
 
   कोरोनासारख्या संकटाने सत्तांतर होत नाही.अफवा उठवल्या तरी बहुजनांमध्ये दंगली घडत नाहीत.अराजकता निर्माण होत नाही. मनुस्मृतीचा कायदा देशात लागू करण्यासाठी आतुर असणा-या प्रवृत्तीना याचे फार मोठे शल्य आहे,असा दावा करुन, महापुरुषाच्या विचारधारेवर हा फार मोठा घाला आहे.वरवरची मलमपट्टटी न करता,शासनाने या प्रकरणाच्या मुळाशी जावे. अश्या प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
     रिपाइंचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी,ज्या प्रवृत्तींना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाचा विटाळ होत असेल अशा प्रवृतींनी खैबरखिंडीत जावे अथवा पाकिस्तानात जावे,अशी प्रतिक्रिया  त्यांचा जाहिर निषेध केला आहे.
 
    रिपाइंचे बारामती लोकसभा विभागाचे प्रमुख बाळासाहेब सरवदे यांनी,कोरोनाच्या संकटकाळात राजगृह या आमच्या अस्मितेवर कुणी हल्ला करत असेल तर त्याला कदापि माफी नाही,असा इशारा देत अशा प्रवृत्तींच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत अशी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
     वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे यांनी, आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केलेल्या संविधानाचा आदर करतो म्हणूनच शांत आहोत.अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्या घटनेचा निषेध केला आहे.