अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले.




इंदापूर : प्रतिनिधी
●अध्यक्ष हाजी एम. डी.शेख यांना पत्रकार प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेवर घेण्याची : सरचिटणीस अरुणकुमार मुंदडा यांची मागणी
         अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन इंदापूर (जि.पुणे) येथे ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्याचे  आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारले होते. मात्र कोरोना महामारीच्या जिल्हाबंदीमुळे सदरचे नियोजित अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस अरुणकुमार एस. मुंदडा यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हाजी एम. डी. शेख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची आज दि. १८ जुलै रोजी झूम मिटिंग झाली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आले. यावेळी मुंदडा यांनी ४ हजार पत्रकारांचे नेतृत्व करणारे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हाजी एम. डी. शेख यांची राज्यपाल नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ जागांपैकी एका जागेवर पत्रकार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी असा ठराव मांडला. त्यास परिषदेचे कोषाध्यक्ष वाय. ए.सिद्दीकी तसेच कार्यकारिणी सदस्य डॉ.संदेश शहा यांनी अनुमोदन दिले. शेख यांची नियुक्ती होण्यासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,  राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना परिषदेच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले. कोरोना जिल्हाबंदी उठल्यानंतर इंदापूरात राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे ठरले.
सूत्रसंचालन परिषदेचे पुणे जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी यांनी केले.