चंदन तस्करांना इंदापूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या ; सहा जणांवर गुन्हा दाखल.



●इंदापूर : प्रतिनिधी (दि.११जुलै)
       
        इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या निमगांव पोलीस दुरक्षेत्रातील पोलिसांच्या टीम ने मोठ्या शिताफिने सापळा रचून चंदन तस्करांना बेड्या ठोकत त्यांना गजाआड केले आहे. यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह सहा चंदन तस्करांवर
भा.द.वी.कलम ३०७,३५३,३७९,२६९,२७०,३४ या सह साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४ महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम १९६४ चे कलम ३ व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४२,५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय इंदापूर यांचे न्यायालयात दि.१० जुलै रोजी हजर केले असता न्यायालयाने  दि.१४ जुलै पर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.
    नाना माणिक पवार वय ५० वर्षे (राहणार वरकुटे खुर्द,ता. इंदापुर जि.पुणे), एका सोळा वर्षाच्या (विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे, हणुमंत विठ्ठल पवार, वय ५० वर्षे (राहणार वरकुटे खुर्द,ता. इंदापुर जि.पुणे), भास्कर विठ्ठल पवार, वय ४० वर्ष (राहणार वरकुटे खुर्द,ता. इंदापुर जि.पुणे), मनु (पूर्ण नाव माहीत नाही) मु.पो. व्याहळी.ता. इंदापुर जि. पुणे, बिना दाडे,(रा.मु.पो.रोपळे, ता.मोहोळ जिल्हा सोलापूर) अशी आरोपींची नावे असून यापैकी केवळ नाना माणिक पवार या मुख्य आरोपीस पोलीसांनी अटक केली.(विधीसंघर्षग्रस्त बालकास) त्याची आईकडे ताब्यात देण्यात आले असून तसा जबाब घेण्यात आला आहे. शिवाय आवश्यकता भासेल तेव्हा पोलीस स्टेशनला हजर करण्याची समज देण्यात आली आहे.
     याबाबत पोलीस काँस्टेबल विशाल चौधर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे कि, ०९ जुलै २०२० रोजी निमगांव केतकी दूरक्षेत्रात कामावर उपस्थित असणाऱ्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार एस.एस.वाघमारे पोलीस,पोलीस काँस्टेबल विशाल चौधर व जाधव कर्तव्यावर हजर होतो. याच दरम्यान वाघमारे यांना एका खब-या मार्फत व्याहळी गावचे हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रात चंदनाची लाकडांची चोरी होणार असल्याची गुप्त माहीती मिळाली. त्यावर तात्काळ आम्ही पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांना याबाबत कळवले. त्यावर सारंगकर यांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा घालण्याच्या सुचना दिल्या. त्यावर आम्ही तीघेही  आमच्याकडे उपलब्ध असणारे वाहन एम.एच.१२ पी.एच.५४७३ या गाडीने व्याहळी गाठली.
       सदर ठिकाणी आम्ही दाखल झालो असता दोन इसम आपल्या मोटर सायकल वरून चंदनाचा माल निमगांवच्या दिशेने घेऊन गेले असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. क्षणाचाही विलंब न करता आमच्या वाहनातून निमगांव केतकीचा मार्ग पकडला. याच दरम्यान बारामती इंदापूर मार्गावर दोन इसम आपल्या मोटर सायकल वरून संशयास्पदरीत्या काहीतरी घेऊन जात असल्याचे आम्हाला आढळले. यावर आम्ही आमचे वाहन पुढे नेऊन उभे केले. मी स्वतः  मोटरसायकल वरील त्या इसमांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसा इशाराही त्यांना केला. मात्र त्यांनी मोटरसायकल न  थांबवता थेट मला मारण्याच्या उद्देशाने अंगावर घातली.यात माझ्या गुडघ्याला मार लागला. व मी खाली पडलो माझ्या कपड्यांवर चिखल देखील उडाला.दरम्यान मोटार सायकल हेलपाडली आणि त्या दोघांना पोलीस हवालदार वाघमारे व पोलीस काँस्टेबल जावध यांनी जागीच पकडले.
     त्यावर तो मोटार सायकलस्वार आम्हाला म्हणाला की, तुम्ही कोणाचे नादाला  लागताय !  तुमच्यासारखे कितीतरी पोलीस मी घालवीन. तुम्ही माझ्यावर केस करा मग बघा मी तुमच्याच विरूद्ध तक्रार करुन तुम्हाला घायला आणतो. असे म्हणून आम्ही करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.त्यावेळी आम्ही त्याला तुम्ही आमच्याशी हुज्जत घालू नका. असे म्हणून त्याचे पूर्ण नाव विचारले असता मी नाना माणिक पवार असे नाव आहे. तुम्हाला काय करायचे ते करा.त्यांच्याकडील मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन गाडीची कागदपत्रे व ड्रायव्हिंग लायसन्स मागितले असता माझ्याकडे नाही असे म्हणाला. त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंन्सिंग न पाळता तोंडाला मास्क ही लावले नव्हते. म्हणून आम्ही त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील मालाची पाहणी केली असता 3 किलो चंदनाची लाकडे अंदाजे  किंमत १२००० रुपये व २५००० रुपये अंदाजे किमतीची यमाहा कंपनी एम.एच.४२ यू ९७९१ असा ३७००० रुपये किमतीचा वर्णनाचा माल घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो. व सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.एन.लातुरे यांनी त्याचा पंचनामा केला आहे. सदर गुन्हा हा दि.०९ जुलै रोजी सायंकाळी ३ वाजून ३० मिनिटांनी मौजे निमगांव केतकी, ता. इंदापूर, जि.पुणे तहसील पोस्ट अॉफिस समोरील इंदापूर ते बारामती रोडवरील पुलाजवळ घडली आहे.
       यातील मुख्य आरोपी नाना माणिक पवार वय ५० वर्षे (राहणार वरकुटे खुर्द,ता. इंदापुर जि.पुणे) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय इंदापूर यांचे न्यायालयात दि.१० जुलै रोजी हजर केले असता न्यायालयाने  दि.१४जुलै पर्यंत  पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.एन.लातुरे करीत आहेत.