सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना , सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावी : नगरसेविका राजश्री मखरे यांची मागणी.



  इंदापूर : प्रतिनिधी -

           इंदापूर नगरपरिषदेच्या सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका राजश्री मखरे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिका-यांकडे केली आहे.
        या संदर्भात पत्रकारांशी बोलताना नगरसेविका राजश्री मखरे म्हणाल्या की, महाराष्ट्र नगरविकास विभागाच्या दि.८ जून २०२० च्या शासन निर्णयात नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे परिपत्रक क्रमांक नपप्रसं २०१९/सेवा.नि.आर्थिक लाभ प्र.क्र.३४३/कक्ष-५/३९८, दिनांक ३१.१.२०१९ अन्वये राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतींना दरमहा प्राप्त होणा-या सहायक अनुदानातून पाच टक्के सहाय्यक अनुदान हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत देय रकमा अदा करण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे.
       सदर परिपत्रकानुसार सेवानिवृत्त कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी,अशी स्पष्ट सूचना आयुक्त तथा संचालक पां.जो.जाधव यांनी दिली आहे.
      केंद्र शासन व राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे इंदापूर नगरपरिषदेने सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार,पेन्शन व इतर सुविधा लागू केलेल्या आहेत, त्यामुळे सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशी आपली मागणी आहे,असे मखरे यांनी स्पष्ट केले.