इंदापूर शहरामधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह



इंदापूर : प्रतिनिधी (दि.२जुलै)
         इंदापूर शहरवासिय व तालुक्यातील नागरिकांसाठी  अतिशय धक्कादायक बातमी  कोरोनाचा फैलाव अतिशय वेगाने होत असून आज चक्क 13 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली आहे.
      दिनांक 1 जुलै रोजी इंदापूर शहरातील एका 57 वर्षीय पुरुषाची आणि जंक्शन परिसरातील 35 वर्षीय महिलेची  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तर दि.30 जून रोजी इंदापूर तालुक्यातील शेळगांव मधील एका 32 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. या सर्व रुग्णाच्या संपर्कातील तब्बल 37 व्यक्तींचा स्वॅब घेण्यात आला होता. यापैकी तब्बल 13 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने इंदापूरकरांना एकच धक्का बसला आहे.
इंदापूर शहारातील एकाच कुटूंबांतील पाच व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.तर शेळगाव मधील 32 वर्षीय रुग्णाच्या संपर्कातील 5 व्यक्ती कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय जंक्शन येथील 35 वर्षीय महिलेच्या संपर्कातील 3 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यात कोरोनाचा फैलाव झाला असल्याचे उघड झाले आहे.
       दिवसेंदिवस इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तब्बल 12  दिवसात तालुक्यात 19 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने इंदापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
     इंदापूर तालुक्यात आता कोरोनाचे एकूण 38 रुग्ण झाले असून यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 16 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी देखील सोडले आहे. तर पुणे येथे 4 रुग्णावर तर मुंबई मधील टाटा रुग्णालयात एकावर उपचार सुरु आहे. इंदापूर कोवीड केअर सेंटर मध्ये 14 रुग्णावर तर बारामती मधील रुई ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.


  इंदापूर शहरातील महतीनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने तो परिसर नगरपरिषदेने सील असून हा परिसर नगरपरिषद प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.