चारा छावणीचालकांची दोन महिन्याची रखडलेली रक्कम शासनाने त्वरित अदा करावी; रणजितसिंह देशमुख यांची मागणी



औंध(वार्ताहर):-
ऐन दुष्काळी परिस्थितीत माण व खटाव तालुक्यातील पशूधन वाचविण्यासाठी चारा छावण्या चालविणाऱ्या छावणीचालकांचे  दोन महिन्यांची  थकीत रक्कम तसेच सात टक्के राखून ठेवलेली रक्कम शासनाने त्वरित अदा करावी अशी मागणी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी लेखी पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी मागील दोन वर्षांपूर्वी माण खटाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती मुळे माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या यामध्ये  येळीव येथील हरणाई सूतगिरणी तसेच पिंगळी येथील  माणदेशी प्रबोधनकार ठाकरे सूतगिरणी यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर अन्य छावणीचालकांनी ही मोठया प्रमाणात चारा छावण्या सुरू केल्या होत्या यासाठी नियमित प्रत्येक जनावरासाठी 115 ते 120रुपये खर्च येत होता मात्र शासनाने 100रुपये अनुदान दिले असून मागील आठ महिन्यापूर्वीचे दोन महिन्याचे थकलेली छावणी चालकांची  रक्कम त्वरित अदा करण्याची मागणी होत आहे. अनेक छावणीचालकांनी कर्जे काढून तसेच अन्य ठिकाणांहुन पैसे उचलून या चारा छावण्या चालविल्या होत्या. त्यामुळे  शासनाने त्वरित  थकलेली रक्कम छावणीचालकांना द्यावी अशी मागणी रणजितसिंह देशमुख यांनी लेखी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.अजूनही  चारा उत्पादक शेतकरी,पशूखाद्य उत्पादक, चारा छावणी चालविणाऱ्या लोकांची देणी देणे बाकी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी छावणीचालक अडचणीत आले आहेत. या चारा छावणीचालकांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नाही तरी शासनाने याबाबत सकारात्मक विचार करावा.
दरम्यान याबाबतचे लेखी निवेदन शुक्रवारी कराड येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, मूणाल पाटील, विक्रमादित्य रणजितसिंह देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.