उपचार नाकारणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची वरुड सरपंच यांची मागणी.



औंध(वार्ताहर):-
कोरोना संशयित युवकावर उपचार न करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वरुडच्या सरपंचांची मागणी.

कोरोना संशयित युवकावर उपचार न करणाऱ्या व दाखल करून न घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वरुड गावच्या सरपंच वैशाली माने यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

याबाबत निवेदनात दिलेली अधिक माहिती अशी, मंगळवार दि.सात रोजी संबंधित युवक पुण्याहून सातारा येथे आला होता त्यास त्रास जाणवू लागल्याने तो सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचारासाठी गेला मात्र तेथे त्यास दाखल नकरता मायणी येथे जाण्यास सांगितले तेथेही तो गेला असता तुम्ही तुमच्या गावात अगोदर जावा असे सांगण्यात आले.
बुधवार दि.आठ रोजी सकाळी तो वरुड गावात आला दोन तास थांबल्यानंतर त्यास पुन्हा त्रास सुरू झाला त्यानंतर त्यास औंध येथून मायणी येथे हलविण्यात आले व गुरूवारी रात्री त्याच्या स्वँबचा रिपोर्ट पाँझिटीव्ह आला त्यानंतर गावात कोणाशीही त्याचा संपर्क आला नसताना चौदा दिवसांसाठी गाव लाँकडाऊन करण्यात आले आहे.

 वरूड गावातील सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.  संबंधित सातारा व मायणी  येथील  अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका वरुड ग्रामस्थांना बसला आहे.

मंगळवारीच जर त्यास सातारा येथे अँडमीट केले असते तर प्रशासन तसेच गावावर आलेला  ताण कमी होण्यास मदत झाली असती त्यामुळे गावास वेठीस धरणार्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी तसेच वरुड गावावर लादलेले लाँकडाऊनचे निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी ही सरपंच माने यांनी तहसीलदारांकडे केली आहे.दरम्यान प्रशासनाच्या चुकीच्या पध्दतीबद्दल ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.