कोरोनाच्या काळातील शहरातील नागरीकांची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच गाळेधारकांचे भाडे माफ करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचेकडे मागणी प्रस्ताव सादर करुन त्याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करून शहरातील नागरिकांना आधार देण्याचे काम करणार असल्याचे माहिती नगरपरिषदेचे सत्ताधारी पक्षाचे गटनेते कैलास कदम यांनी दिली.
दि. ३ जुलै २०२० च्या शासन आदेशानुसार बुधवार दि.१४ जुलै रोजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व नगरसेवक व नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना गटनेते कैलास कदम यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्याची आणेवारी २०१८ मध्ये ५० पैश्यापेक्षा कमी होती.त्यामुळे २०१८ मध्ये इंदापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता. दुष्काळाचा परिणाम शहरातील नागरीकरण व अर्थव्यवस्थेवर देखील होतो. तसेच गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाच्या काळातील शहरातील नागरीकांची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच गाळेधारकांचे भाडे माफ करणेसंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचेकडे प्रस्ताव सादर करणेसंबंधीची सुचना त्यांनी मांडली. त्यास सर्वानुमते पाठिंबा देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.