इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात तूर्तास लाॅकडाऊनची गरज नाही,असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (दि.१७ जुलै) येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत व्यक्त केले. ते म्हणाले की, इंदापूर शहरातील व ग्रामीण भागातील लोकांनी विशेषतः भाजी विक्रेत्यांनी मास्क वापरणे सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. मास्क न लावता फिरणारांवर दंडात्मक कारवाई केली जावी. पंचायत समितीच्या आरोग्य विभागासह इतर कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होवू नये याची दक्षता घ्यावी, अश्या सूचना त्यांनी दिल्या.कोरोनावर उपचार घेणारे तालुक्यातील ३२ रुग्ण ठणठणीत बरे होतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मास्क न वापरता फिरणारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. त्यामुळे तश्या लोकांचा वावर सध्या कमी झाला आहे,अशी माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायणराव सारंगकर यांनी दिली.शहराच्या काही भागात सुरु पानटपऱ्या काही कालावधीसाठी बंद करण्यात येतील.अशी माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायणराव सारंगकर यांनी दिली.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी,असे आवाहन त्यांनी केले. तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल, उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे दिलीपराव पवार, भिगवण पोलीस ठाण्याचे जीवन माने,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व इतर मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.
: पत्रकाराच्या सुचनेला आ.भरणे त्वरित कृतीतून दिली दाद .....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका जेष्ठ पत्रकाराने आ.भरणे यांच्याकडे शहरातील काही विक्रेते मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी त्या पत्रकाराच्या सुचनेला लगेच आपल्या पी.ए.ला सांगून गाडीमध्ये असलेले मास्क आणायला सांगितले आणि ते मास्क सदर ठिकाणी ताबडतोब वाटण्यासाठी देण्यात आले. यामुळे तालुक्यामध्ये कार्यक्षम आमदार म्हणून परिचित असलेल्या आ.भरणे यांची प्रचिती पुन्हा एकदा इंदापूर शहरवासियांना आली.