परिक्षेत्र वनविभागाचे माण तालुक्यातील वृक्षतोडीवर मौन.अधिकारी व कर्मचारी सध्या गांधारीच्या भूमिकेत






 म्हसवड -
     एकीकडे माणतालुक्यातील अनेक गावात टँकरने पाणी देऊन माण तालुका हरीत करण्याचा ध्यास घेऊन अनेक ग्रामस्थ वृक्ष जगवण्यासाठी धडपडत आहेत.तर माण तालुक्यातील परिक्षेत्र वनविभागाचे कार्यालय प्रमुख अन कर्मचारी डोळे उघडे ठेवून मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील वृक्षतोडीवर मौन पाळत असून अशा ठिकाणी कारवाई करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे माणच्या माथी मारलेला दुष्काळी हा शिक्का पुसला जाणार का ? जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकार्यामुळे स्वप्नच राहणार का ? असा सवाल माणदेशी जनतेकडून विचारला जात आहे.


          माणतालुका हा महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध पण हा दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी अलिकडे चार पाच वर्षात श्रमदानाच्या माध्यमातून येथील जनता व शासनपातळीवर प्रयत्न होऊ लागले असून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे व वृक्षलागवड होऊ लागली आहे. त्यामुळे दुष्काळ हा काहीसा अस्पष्ट होऊ लागला असतानाच तालुक्यातील लोकांना स्वयंपूर्तीने वृक्ष लागवडीचे महत्त्व समजल्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करु लागलेत.झाडे जगवण्यासाठी वेळप्रसंगी टँकरने पाणी आणून झाडे जगवण्यासाठी धडपडत केली जात आहे.वृक्ष तोडीवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी सध्या गांधारीच्या भूमिकेत असून ते आपल्या शासकीय वाहनातून धुरळा उडवत तालुक्यात फिरत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात तीन ठिकाणच्या वनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात आग लागून हजारो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.या संबंधी या कार्यालयाशी संपर्क केला तरी थाथूरमातूर कारणे देऊन बोळवण केली जात असून फक्त गवत जळाले आहे वृक्ष जळाले नसल्याचे सांगितले जात आहे. पण या घटनांची संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करणे गरजेचे असताना डोक्याला ताप नको जळलं तर जळू द्या अशी भूमिका सध्या या कार्यालयातील कर्मचारी घेत आहेत.त्यामुळे या अधिकारी अन कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी दुष्काळग्रस्थांकडून होत आहे.
       माणतालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून गत महिन्यात दहिवडीत एका पेट्रोल पंपावर अवैध वृक्षतोड करुन चाललेला ट्रकवर कारवाई करत ताब्यात घेतला होता. प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई केली पण ज्यांच्यावर हि जबाबदारी आहे ते मात्र मूग गिळून गप्प आहेत ते का कारवाई करत नाहीत? आजवर संबंधित खात्याने किती कारवाई केल्या ? हा संशोधनाचा विषय आहे तर संबंधित विभाग अवैध वृक्ष तोडीवर कारवाई करत नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.तरी संबंधित विभागाने हा दुष्काळी भाग लक्षात घेऊन अवैध वृक्ष तोडांवर कारवाई करुन दुष्काळी हा शिक्का पुसण्यासाठी येथील जनतेला साथ द्यावी अशी मागणी होत आहे.


राजू मुळीक तालुकाध्यक्ष ग्राहक प्रबोधन समिती - वन विभागाच्या हद्दीत आग लागण्याची गेल्या आठ दिवसांतील ही चौथी घटना आहे. यापूर्वी दहिवडी-गोंदवले हद्दीत,किरकसाल हद्दीत तसेच दहिवडी-फलटण, राणंद शेवरी रस्त्यालगत आग लागली होती.या चारी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली होती.परंतु यामध्ये संबंधित विभागाकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राजू मुळीक यांनी केला आहे. वन विभागाच्या हद्दीतच वारंवार आग लागतेच कशी? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी श्री मुळीक यांनी केली आहे.

चौकट
या ठिकाणी मुख्य कार्यालयात फॉरेस्ट अधिकारी यांना अवैद्य वृक्ष तोडी बाबत विचारणा केली असता खुद्द अधिकारी म्हणतात तुम्ही तक्रार द्या मग आम्ही कारवाई करतो जर शेतकरी त्याची खासगी झाडे तोडत असेल तर आम्हाला लेखी तक्रारी असल्या शिवाय काही करता येत नाही.



चौकट
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जर अवैद्य वृक्ष तोड आणि अवैद्य वाहतूक या बाबत योग्य महिती दिली तर माहिती देणाऱ्याचे नाव लगेच त्या व्यक्तीला समजले जाते मग ती व्यक्ती माहिती देणाऱ्यार दबाव आणते.गोपनीय माहिती देणाऱ्याचे नाव संबंधीताला समजते कसे ?

   शेत कुंपणानं खाल्लं तर दाद कुणाकडं मागायची?

वनसंपदा जतन करणारेच हात माणमधील झाडांच्या मुळावर उठल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.त्यामुळे दुष्काळमुक्तीच्या वाटेवर चक्क वन विभागच अडसर ठरत आहे.याबाबत संबंधित विभाग मूग बसल्याने हरित माणचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.